Friday, August 18, 2017

आझादी के बदलते प्रतिक


तीन दिवसांपूर्वीची घटना. 15 ऑगस्ट, सकाळचे दहा वाजले असावेत. औरंगाबादहून पुण्याकडं निघालो होतो. बस अहमदनगर रोड लागली होती. औरंगबादकडून नगरकडं निघालात की, शहर संपण्यापूर्वी रस्त्याच्या मधोमध ठेवलेला एक रणगाडा (टैंक) लागतो. आजकाल टैंक म्हंटलं की, युद्धाचीही आठवण होत नाही आणि बॉर्डर सिनेमाचीही. फक्त आठवण होते ती राष्ट्रभक्तीची आणि टैंकमार्फत ती रूजविण्याचा सिद्धांत मांडणारे जेएनयूचे कुलगूरू जगदीश कुमार यांची.

सकाळी कॉलेजमधलं ध्वजारोहण आटोपून पुण्याकडं निघायचं होतं. कॉलेजकडं जाताना सकाळी  7 च्या दरम्यान वगैरे सेव्हन हिल चौकात रस्ता ओलांडताना 30 – 35 दुचाकीस्वार पांढरं शर्ट, त्यावर जॅकेट चढवून कर्णकर्कश हॉर्न वाजवत, अर्थात गाडीचा आणि तोंडाचा हॉर्न वाजवत समोरून निघून गेले. गाडीवर उंचच्या उंच झेंडे लावले होते. त्यातल्या मागं असलेल्या दोन तीन दुचाकीस्वारांना सगळ्यांच्या पुढं जायचं होतं म्हणून त्यांच्या गाड्या नो एंट्रीतून घुसून रहदारीच्या विरुद्ध बाजूंनं जोरजोराचा हॉर्न वाजवत निघून गेल्या. अर्थात हे सांगायचं म्हणजे ही होती यावर्षीच्या 15 ऑगस्टची माझी स्वातंत्र्याची पहाट. दिवाळी पहाट सारखं स्वातंत्र्य पहाट असं कोणी काही करत नाही ते एक बरंय म्हणा...

तर वापस अहमदनगर रोडकडं येवू. दरवेळी येता जाता हा रणगाडा कठड्यानं बंदिस्त केलेल्या अवस्थेत तिथंच उभा असतो, एकटाच. त्याच्या जोडीला असतात फक्त धूर सोडत आणि धूळ उडवत जाणारी वाहनं.  15 ऑगस्टला मात्र  त्याला दुचाकी आणि चारचाकींच्या पार्किगनं आणि त्यातून पांढरे कपडे घालून आलेल्या सेल्फी घेण्यात मग्न असलेल्यांनी वेढलं होतं. त्याला बंदिस्त करणाऱ्या कठड्याच्या चारी कोपऱ्यावर तिरंगा लावण्यात आला होता. स्त्री – पुरूष, लहान मुलं - मुली बिनधास्त त्याच्यासमोर उभारून सेल्फी काढत होती. काही मंडळी फेसबुक प्रोफाईल पिक्चर आणि डिपीसाठी रणगाड्याला सॅल्यूट करतानाच्या पोझमधला फोटो काढत होती. हे सर्व फोटो काढत होते, तेही 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी म्हणजे त्यांच्यासाठी हा रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक बनलाय का ?  

माझी बस 30 सेकंदात तिथून निघून गेली असेल. हे सगळं पाहताना निर्माण झालेल्या प्रश्नांचं वादळ अजून शमलं नाही म्हणून हा ब्लॉगप्रपंच.. बेसिक प्रश्न पडलाय.  अरे, रणगाडा, कोणत्या स्वातंत्र्याचं प्रतिक असू शकतं आणि कसं. म्हणजे जगदीश कुमांरासाठी ते राष्ट्रभक्ती रुजविण्याचा हत्यार असू शकतं. पण स्वातंत्र्याचा काय संबंध...

मला वाटतं रणगाडा प्रतिक आहे हिंसेचं, वर्चस्ववादाचं, आक्रमणाचं, क्रुरतेचं आणि दहशतीचं. आपल्या मुर्खात काढण्यासाठी सांगण्यात आलेल्या सामर्थ्याचं.  रणगाडा म्हणजे एका अर्थानं यांत्रिक दहशतवादीच. पण ते स्वातंत्र्याचं प्रतिक कसं ठरणार ? 

स्वातंत्र्यदिनाचा आणि रणगाड्याचा काय संबंध. कदाचित आपली स्वातंत्र्याची प्रतिकं बदलत चालली आहेत का ? सतत एकमेकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आपण मंडळी आपली नवीन वर्चस्ववादी स्वातंत्र्याची प्रतिकं तयार चाललोय का ? स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निघणाऱ्या प्रभात फेऱ्या दुचाकीस्वारांच्या त्या झुंडीत रूपांतरित होण्याचा अर्थ काय ? ‘भारत माता की जय’चं रूपांतर त्या दुचाकीस्वारांच्या दहशत निर्माण करणाऱ्या झुंडशाहीच्या ओरडण्यात होतंय ? झुंडशाही आणि स्वातंत्र्य या पूर्णपणे एकमेकांविरोधी नाहीयेक का ?      

आधुनिक पद्धतीनं पारतंत्र्यात जाताना स्वातंत्र्याची बदलती प्रतिकं म्हणजे स्वातंत्र्यांबद्दलच्या आपल्या बदलत्या मानसिकतेची नव्यानं होत जाणारी ओळख आहे. आपल्या लायकीनुसार आपल्याला सगळं मिळतं, सरकार, सिनेमा, कला, जीवन...जगदीश कुमार आपल्या बदलत्या मानसिकतेचं तर प्रतिबिंब नाहीये ना.     


औरंगाबाद शहराच्या सुरूवातीलाच हा टैंक आहे. तो टैंक औलांडून जाणारा लगेच राष्ट्रभक्त होत असावा, म्हणजे औरंगाबादमधले सगळेच राष्ट्रभक्त. तोच रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक बनला असेल तस्लीमा नसरीनच्या स्वातंत्र्यांचं काय... स्वातंत्र्याच्या सकाळचा हा अनुभव अनेक प्रश्नांना जन्म देवून जातोय. अनेकांच्या डोक्यात अनेक प्रश्न पडले असतील. पुण्यात पोहचल्यावर अनेकांना बोललो ही याबद्दल पण स्वातंत्र्याचं प्रतिक रणगाडा ? याचं उत्तर मात्र मिळत नाहीये.  जर रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक असेल तर सरकारनं आता यापुढं युद्धासाठी रणगाडे न बनवता सरकारी कार्यालयं, चौक, सिनेमागृह, शाळा, कॉलेजांमध्ये बसविण्यासाठी त्यांची निर्मिती करायला हवी...

Friday, January 22, 2016

Drought Memory 1 : पाणीवाला

तुमच्याकडे नगरसेवकाचा, आमदार – खासदाराचा नंबर नसला तरी चालेल, पण पाणीवाल्याचा नंबर असायलाच हवा. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवरील जनरल नॉलेज नसेल तरी चालेल पण तुमच्या भागातील पाणीवाला कोण ? याची माहिती तुमच्याकडे असायलाच हवी. तो राहतो कुठे, किंवा त्याची भेटण्याची ठिकाणं तुमच्या कॉलनीतील कोणाला तरी नक्की महिती असायलाच हवीत. तुमची इच्छा असो किंवा नसो पण तुमच्यातील कोणाचे तरी पाणीवाल्यासोबत चांगले संबंध असायलाच हवेत.
तुम्हाला वाटत असेल आता हे काय नवीनच, पण मराठवाड्यातील अनेक शहरातील ही स्थिती आहे. म्हणजे ज्या शहरांना नगरपालिका, महानगरपालिका पाणी पुरवठा करते. तिथली ही गोष्ट आहे. शहरांमध्ये विविध भागात पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या मोठ्ठाल्या टाक्या उभारल्या आहेत. म्हणजे लातूरमध्ये तर बार्शी रोडला पाण्याची टाकी नावाने ओळखला जाणार परिसरच आहे. त्या टाक्यातंर्गत विविध प्रभाग असतात. त्या भागात पाणी सोडण्यासाठी जे लोक असतात, ते नगरपालिका, महानगरपालिकांचे  कर्मचारी असतात. पण सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ते असतात पाणीवाले.
मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये कमीत कमी चार दिवसांनी पाणी येतं. मध्ये केव्हा तरी जास्त पाऊस झाला होता, त्यावर्षी मात्र एक दिवस आड पाणी यायचं. पण ते काही जास्त दिवस नाही. मध्ये मध्ये तर १५ दिवसाला पाणी यायचं. आता सध्या २० दिवसाला पाणी येतंय. काही शहरांना तर आता नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. नळ हे फक्त घरातील शोभेची वस्तू बनले आहेत.
जाऊद्या आताच्या लेखाचा तो विषय नाही, पुढच्या लेखात वगैरे लिहिन कधीतरी.
तर पाणीवाला हा जो व्यक्ती आहे, तो आवर्षणग्रस्त शहरांतील सर्वांसाठी जास्तच महत्त्वाचा. म्हणजे  पाणी कधी येणार आहे, कधी नाही. कोणत्या वारी पाणी येणार. किती वेळ पाणी असेल याच्यावर सर्व नियंत्रण या गड्याचं. नागरिकांच्या रोषाला आणि आभारालाही सामोरे जाणारा हाच. कधी त्याच्याबद्दल चांगलं तर कधी त्याच्याबद्दल वाईटही बोललं जाणार. पण सगळ्यांच्या जीवनात याचं स्थान थोडं फार तर असणारच. म्हणजे आता लातूरात पाणी येऊन १८ दिवस झाले. मग सगळे एकच म्हणतात, पाणीवाल्याला विचारून या की, कधी पाणी सोडणार आहे, मग दररोज वेगळी वेगळी माणसं जातात आणि त्याला विचारून येतात. मग तो ही सांगतोय, दोन दिवसांनी. पाणी नसल्यामुळे टप्प्याटप्याने पाणी सोडायला चालू आहे. तुमच्या भागाचा नंबर दोन दिवसांनी येईल. मग त्यांनं तिकडून तसं सांगितलं की, लोकं तळ गाठलेले घरातले सिंटेक्स, टाक्या, हौद साफसफाई करायला सुरूवात करतात. कारण पाणी आल्यानंतर ते पाणी पुढचे २० एक दिवस वापरायचं असतात (आता हे वाचून काहींना मळमळ व्हायला सुरूवात होईल, पण हे वास्तव आहे). त्यामुळे साठवायच्या वस्तूंची साफ सफाई केल्याशिवाय पर्याय नसतो.
तसं या सर्व भागांमध्ये पाणी येण्याची काही ठरलेली वेळ नसते. म्हणजे पूर्वी जेव्हा वार ठरवून दिलेले असायचे तेव्हाही काही ठराविक अशी वेळ नसायची. मग लोक दिवसभर वाट बघत बसणार. घरगुती कार्यक्रम, लग्न यांचे मुहूर्तही पाणी येण्याचा दिवस सोडून. म्हणजे मुहूर्त बघण्याची पद्धत एवढीच, ज्या दिवशी पाणी येणार आहे तो दिवस सोडून कधीही कार्यक्रम, लग्न करा. मग कधी सकाळी चारला, कधी रात्री १२ ला, कधी रात्री २ ला, कधी दुपारी अशी पाणी येण्याची वेळ. आता या सगळ्या मागं पण पाणीवाल्यांचं एक गणित असतं. एका भागाला पाणी सोडलं की, पुन्हा टाकी भरायला वेळ जातो. त्यात लाईट असली तर बरं, नाही तर सगळं बोंबललं म्हणून समजा... टाकी भरली की लगेच पाणी सोडायचं, त्याला वेळ काळ नावाचं काही बंधन नाही. रात्री पाणी सोडायचं असलं की हा पाणीवाला त्या त्या भागात जाणार, ओरडून ओरडून लोकांना उठविणार, पाणी सोडतोय सांगणार. मग जी लोकं उठली ती इतर न उठलेल्यांना उठविणार, आणि मग हा जाऊन पाण्याचा वॉल्व्ह सोडणार. तोपर्यंत लोक पाईप वगैरे लावून, मोटारी लावून तयार. मग रात्री २ वाजता पाणी भरायचं. पूर्वी सरासरी २ तास पाणी असायचं. घरातल्या स्त्रियाही कपडे – भांडे वगैरे सगळं तेव्हाच धुवायच्या, म्हणजे कसं नंतर साठविलेल्या पाण्यातलं पाणी उडणार नाही. मग काय तो पर्यंत सकाळच व्हायची. दुसऱ्या दिवशी पाणीवाल्याचं कौतूकच. सगळ्यांना उठविलं म्हणून.
कधी कधी टाकी पूर्ण भरलेली नसायची पण नियोजन लागावं म्हणून पाणी सोडलं जायचं. पाणी आलं म्हणून सगळेजण आधीचं शिळं पाणी झाडांना वगैरे टाकून देणार. सगळं रिकामं करणार आणि मध्येच जिथं पाण्याची टाकी आहे तिथली लाईट गेली की मग नळाचंही पाणी जाण्याच्या अनेक घटना सातत्याने घडायच्या. टाकी भरलेली नसल्यामुळे पाणीही बंद व्हायचं. म्हणजे हे जरा जास्तच विचित्र प्रकरण असायचं. अशा वेळी लोकांना जेवढा राग येत असेल ना तेवढी कधीच येणार नाही. मग पाणीवाल्याच्या खाणदाणाचा उद्धारच. सगळ्या महिलांचा मोर्चा वळायचा तो पाण्याच्या टाकीकडं. पाण्याची टाकी म्हणजे ह्या पाणीवाल्याचं दुसरं घर. तिथं जाऊन त्याला जाब विचारायचा या रागात सगळ्या निघायच्या. पण त्या पट्ट्यालाही माहिती असायचं की असं काही झालं की आपलं  काही खरं नाही म्हणून तो तिथून गायब व्हायचा. असं अचानक पाणी गेल्यानंतर त्याला भांडायला गेलेल्या लोकांना तो काही आजपर्यंत तिथं भेटला नाही. नंतर लाईट आल्यानंतर पाच -  सहा तासांनी टाकी भरली की पाणी तो पाणी सोडणार आणि मग फिरत फिरत त्या भागात चक्कर मारणार.अशा वेळी त्याची कारणंही ठरलेली. पण त्याचा व्हायचा तेवढा उद्धार झालेलाच असायचा.
कधी कधी रात्री १० वाजता वगैरे पाणी सुटलं की, ते १२ वाजता बंद होणं नागरिकांना अपेक्षित असायचं. पण १ वाजले २ वाजले ३ वाजले तरी पाणी काही बंद व्हायची शक्यता नाही जाणवलं की ठरलेल्या  मराठवाडी टोनमध्ये एक वाक्य सातत्याने तोंडातून निघणार, “मेला, कडूभाड्या पडला वाटतं पिऊन कुठंतरी.” पाण्याच्या बाबतीत जी मंडळी थोडी फार जागरूक असते ती पाणी भरून झाली की नळ बंद करून ठेवणार पण काहींची मात्र मज्जाच असणार गाड्या धुवा. घरं धुवा इथंपासून गटारी धुवायलाही मागं पुढं न पाहणारी माणसं तुम्हांला भेटतील. कुणाला वाटलं तर तो पाणीवाल्याला शोधायला जाणार,भेटला चुकून तर पाणी बंद करायला लावयचं नाही तर रात्रभर पाणी चालूच.
कधी कधी पाणीवाल्याची मात्र चांदी असायची, एखाद्या भागात कोणाचं लग्न असलं, किंवा कार्यक्रम असला की त्याला लोकं नियोजित तारखेपेक्षा आधीच पाणी सोडण्याची विनंती करायचे. अशावेळी काय त्याचं महत्त्व एकदम वाढलेलं वाटणार ? ज्याच्या घरी लग्न आहे त्या घरातला कर्ता पुरूष पाणीवाल्याला भेटायचा प्रयत्न करणार. पण तो काही त्यावेळी भेटायच्या मूडमध्ये नसणारच. घरी गेलं की तिथंही नसणारच. कारण डिमांड वाढलेली असते ना. थोडा फार भाव खाणार पण लोकांच्या विनंतीला ही पाणी सोडणारी मंडळी कधी नाही म्हणायची नाहीत. कारण त्यांनाही माहिती असायचं की लोकांसाठी पाणी काय गोष्ट आहे. त्यात घरी कार्यक्रम म्हटलं की, ‘लोकांना कार्यक्रम कसा होईल याची काळजी कमी आणि आलेल्या पाहुण्यांना पाणी कमी पडू नये याचीच काळजी जास्त’. पाणी सोडलं की, लोकंही आनंदानं त्याला काही पैसे आभार म्हणून देतात.
शाळेतून येणाऱ्या पोरांना पाण्याच्या पाईप लाईनच्या वॉल्व्ह जवळ पाणीवाला दिसला की ही पोरं जोरात सायकल मारत घरी जाणार, ‘पाणी सोडायलंय, पाणी सोडायलंय’ असं सगळ्यांना सांगणार. नळाला पाणी येणारा दिवस आजही रविवारपेक्षा मोठा असतो जिथं २० दिवसाला पाणी येतं तिथं.  म्हणजे कोणालाही पाणीवाला पाण्याचा व्हॉल्व्ह सोडताना दिसला की काहीही कितीही महत्त्वाचं काम असलं तरी पाणी येतंय हे सांगण्यासाठी घरी वापस जाणं ही जितकं त्याला महत्त्वाचं वाटतं तितकं दुसरं काही नाही.
सायकल, सायकलीला अडकवलेला वॉल्व्ह सोडायची (म्हणजे वॉल्व्ह लूज करायची) किल्ली , डोक्यावर टोपी. खाकी पोशाख. अशी पाणीवाल्याची ओळख आजही तशीच आहे. व्यक्ती बदलल्या असतील पण त्याची प्रतिमा तशीच आहे. पाणीवाला हा महापालिकेचा कर्मचारी असला तरी तो ठरलेल्या एकाच सामाजिक स्तरातून आलेला आहे असे जाणवले, कांबळे, गायकवाड, साठे, शेख इत्यादींनाच तिथं १०० टक्के आरक्षण . काही मोजक्या लोकांसाठी हा पाणीवाला थट्टेचा विषयही असतो. पण अशी थट्टा करणारी मंडळी खूप कमी असतील. अनेकांना मात्र दिसतो तो ‘त्यांच्यासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे डोक्यात ठेवून रात्री बेरात्री लोकांना अगोदर उठवून नंतर पाणी सोडणारा पाणीवाला’
कोणाच्याही रक्ताच्या नात्यातील नसतानाही, किंवा वैचारिक नातं नसतानाही, किंवा दररोजचं उठणं – बसणं नसतानाही पाणीवाल्याचं सगळ्यांसोबत एक नातं तयार झालेलं आहे. ते कदाचित फक्त दुष्काळ आणि पाणी यामुळंच.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Thursday, December 24, 2015

शोषितांच्या साहित्याला नवीन आयाम मिळणार

उद्या दिनांक २५, २६ डिसेंबर २०१५ रोजी अमर शेख यांच्या गावी म्हणजेच बार्शीला शोषित, श्रमिक, कामगार, स्री यांचे जीवन नव्या स्तरावर आपल्या लेखनीतून ज्यांनी मांडले त्या आण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सुरू होणारे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
अण्णाभाऊ आणि अमर शेख ही दोन नावं अशी आहेत की, ज्यांच्या साहित्यामध्ये फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातील नव्हे तर अख्ख्या जगातील शोषितांच्या समान दु:खाचे प्रतिबिंब उमटले आहेत. पण त्या साहित्याची हवी तेवढी चर्चा मात्र झाली नाही तर दोघांचीही फक्त उपेक्षाच झाली.
शाळेमध्ये असताना १ अॉगस्ट ला भाषण स्पर्धा आयोजित केलेली असायची. विषय असायचे लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे, सहावीला असताना पहिल्यांदा त्या स्पर्धेत भाग घेतला... त्यानंतर पुढे सलग दहावीपर्यंत या स्पर्धेच्या निमित्ताने अण्णाभाऊ या विषयावर वाचन, लिखान झाले. माझ्या आयुष्यात मला भेटलेला आणि जवळचा वाटलेला पहिला लेखक म्हणजे अण्णाभाऊ. माहिती नाही का? आज विचार करतो तेव्हा टिळकांपेक्षा अण्णाभाऊच मला का भावले असतील याची उत्तरं मिळतातही.
अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायक वा नायिका ही रानावनात राहणारी, ग्रामीण भागात जगणारी, भोळी - भाबडी पण शोषणाविरुद्ध संघर्ष करणारी होती. अण्णाभाऊंनी उभा केलेला नायक हा सातत्याने व्यवस्थेविरूद्ध बंड करणारा क्रांतीकारक होता. कदाचित तो नायक आमच्या लेच्यापेच्या भूमिका घेणाऱ्या नेत्यांना व साहित्यिकांना झेपलाच नसावा, म्हणून की काय ? अण्णाभाऊंचे साहित्य उपेक्षित राहिले.
काही दिवसाखाली "ख्वाडा" चित्रपट पाहिला. त्यातील नायकाने मला अण्णाभाऊच्या साहित्यातील क्रांतीकारकाचीच आठवण करून दिली. भाऊराव कऱ्हाडे यांना चित्रपटविषयी प्रतिक्रिया देताना मी त्यांना अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायक आणि चित्रपटातील नायक समान पातळीवर जाणवल्याचे सांगितले होते.
अण्णाभाऊंनी ग्रामीण भागात, रानावनात भटकणाऱ्या स्रीला नायिका बनविलं तेही आमच्या प्रस्थापित साहित्य निर्माण करणाऱ्यांना झेपले नाही. कदाचित ती मंडळीही व्यवस्थेचाच बळी ठरली असावी.
१९५८ च्या साहित्य संमेलनात बोलताना अण्णाभाऊंनी "ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती शोषित कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे." सांगत तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि अर्थिक हितसंबंधांचा बुरखाफाड केला होता.
उद्यापासून सुरू होणाऱ्या साहित्य संमेलनात या सगळ्यांवर वर्तमान संदर्भात चर्चा होईलच. पण उपेक्षितांचं जगणं मांडणारे साहित्य उपेक्षित राहणार नाही, आण्णाभाऊ आणि अमर शेख यांच्या विचार मरणार नाहीत, त्यांचे साहित्य अजरामर करण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत ते पोहचविण्यासाठी धोरणही ठरविण्यात येतील.
काही दिवसांपूर्वी एका बातमीतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राला प्रमुखच नसल्याचे उघड झाले होते. महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठात हीच परिस्थिती आहे. अण्णाभाऊंच्या साहित्याचे पाईक असणाऱ्या कोणीही का याची दखल घेतली नाही? या बद्दल आश्चर्य वाटते. संमेलनात सहभागी होणारी मंडळी या परिप्रेक्षातूनही अण्णाभाऊंचा व त्यांचा उहापोह करेल अशी अपेक्षा.
मल्लिका अमर शेख यांच्या "मला उद्ध्वस्त व्हायचंय" या पुस्तकात अण्णाभाऊ वारल्यानंतर अमर शेखांची झालेली अवस्था मांडण्यात आली आहे. त्यातून अण्णाभाऊ आणि अमर शेख यांच्या मैत्रीचा बंध समजण्यात मदत होते. अमर शेखांच्या जन्मशताब्दीनिमित्त बार्शीत होणारे अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन शोषितांचा साहित्यातील आवाज बुलंद करेल अशी अपेक्षा. अण्णाभाऊंनी उभा केलेला नायक आजच्या साहित्यात निर्माण करण्यासाठी दंड थोपाटले जावेत.
मी ही अण्णाभाऊंच्या साहित्याचा एक वाचक आणि चाहता म्हणून संमेलनात सहभागी होतोय. संमेलनाला शुभेच्छा.. पुढील दोन दिवसात मला नवीन अण्णाभाऊ सापडेल, कळेल या अपेक्षेन बार्शीच्या दिशेने प्रवास करतोय.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Saturday, September 19, 2015

नवे संविधान नेपाळसाठी स्थैर्याचा किरण ठरणार ?


रात्री बाराच्या ठोक्याला नेपाळमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. आठ वर्षाच्या वादानंतर आज नेपाळमध्ये परत एकदा संविधानाचे राज्य परतलेले असेल. विरोध, जाळपोळ, आंदोलने यातून करपून सुलाखून निघालेला नेपाळ या नव्या संविधानाच्या अंमलबजावणीने स्थिर होईल (?) अशी अपेक्षा करण्यास संविधानिक भारतातील एक नागरिक म्हणून काय हरकतही नाही. पण मुळत: संविधानाच्या मान्यतेपासून निर्माण झालेला वाद नेपाळला स्थिरावू देईल का?

आजपासून लागू झालेल्या नेपाळच्या संविधानाने नेपाळला संघराज्य आणि धर्मनिरपेक्ष राज्याचा दर्जा दिला आहे. नेपाळची विभागणी सात प्रांतामध्ये झालेली असेल. प्रतिनिधीमंडळातील सदस्यांची संख्या जनसंख्येवर नाही तर भौगोलिकतेवर आधारलेली असेल.
नेपाळमध्ये सध्या माओवाद्यांनी समर्थन दिलेले सरकार अस्तित्वात आहे. ८ वर्षापूर्वी सत्तेत आल्यावर नवीन संविधान निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केली. पण दोन वर्षातच सत्तेतून त्यांना पायउतार व्हावे लागले. त्या माओवादी आणि प्रस्थापित पक्ष यांच्यात युती होऊन नवीन सरकार अस्तित्वात आहे. पहिल्यांदा स्थापन केलेली संविधान सभा विसर्जितही करण्यात आली. सध्याचे संविधान हे दुसऱ्यांदा स्थापन केलेल्या सभेने तयार केले आहे. म्हणजेच नव्या संविधानाचा संपूर्ण प्रवास हा अस्थैर्याचाच आहे.
१४ सप्टेंबरला संविधान सभेने नव्या संविधानाचा स्विकार केला, पण त्याचवेळी संपूर्ण नेपाळमध्ये या संविधानाच्या विरोधासाठी आंदोलने मोर्चे चालू होते.
हा विरोध मुख्यत: तीन मुद्दयांभोवती फिरत आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये मुख्यत: महिला, दलित आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांचा समावेश आहे. पण या तिनही समूहगटांच्या विरोधाची कारणे भिन्न आहेत.
सध्या सत्तेत असणारे माओवादी व इतर पक्षांचे नेतृत्व हे उच्चवर्णियांच्या हाती आहे. त्या निर्णय प्रक्रियेत दलित समाजगटाचे प्रमाण अत्यल्प असल्याचा आरोप स्थानिक दलित संघटना करीत आहेत. संविधानामध्ये त्यांचे प्रतिबिंब पडल्यामुळे दलित व इतर मागास गटांसाठी असलेल्या कोट्याचे प्रमाण हे कमी करण्यात आल्याचा मुख्य आक्षेप या दलित संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे व इतर काही तरतुदीमुळे दलितांच्या शोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या नव्या संविधानातील काही तरतुदींमुळे महिलांनीही बंड पुकारले आहे. एकीकडे महिलांना समानतेची वागणूक देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात असताना नेपाळच्या संविधानातील काही तरतुदी या आश्चर्यकारक आहेत. त्यातील एका तरतुदीनुसार नेपाळच्या महिलेने परदेशी व्यक्तीशी विवाह केल्यानंतर त्यांना होणाऱ्या मुलाला नेपाळचे नागरिकत्व मिळण्यासाठी पहिल्यांदा तिच्या पतीने नेपाळच्या राष्ट्रीयत्वाचा स्विकार करणे बंधनकारक केले आहे. हा मुद्दा देशाच्या नागरिकत्वाशी संबंधित असल्यामुळे महिलांचा याला आक्षेप नाही. पण नेपाळी पुरूषाने परदेशी महिलेशी विवाह केल्यानंतर त्यांच्या मुलाला मिळणाऱ्या नेपाळच्या नागरिकात्वासाठी काहीही अट ठेवण्यात आली नाहीये. मग महिलांसोबतच ही असमानता आणि बंधनं का ? यासाठी या महिलांना संविधानातील महिलाविरोधी तरतुदींविरोधात बंड पुकारले आहे.
नेपाळने या नव्या संविधानच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेचे धोरण अवलंबिले आहे. याला देशातील कट्टर हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने विरोध दर्शविला आहे. त्यांच्या मागणीनुसार नेपाळची हिंदु राष्ट्राची ओळख पुनर्पस्थापित करून द्यायला हवी होती. त्यासाठी त्यांनी जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्याचाही मार्ग स्विकारलाच. धर्माच्या नावाखाली जगभर वाढणारी हिंसा लक्षात घेता संविधानसभेच्या धर्मनिरपेक्षतेचे तत्व अवलंबविण्याच्या निर्णयाचे अभिनंदन आणि कौतुक करणे गरजेचे आहे. पण संविधानातील सनातन धर्माची सुरक्षा करणे हे राज्यसंस्थेचो आद्य कर्तव्य मानण्यात आले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.
दलित, महिला आणि हिंदू यांचा संविधानातीव तरतुदींना असणारा विरोध, आतापर्यंत आंदोलनात गेलेले ४५ बळी नेपाळसाठी स्थैर्याची नवी पहाट निर्माण होऊ देतील का हा मला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न वाटतो.
माओवाद्यांनी नवे संविधान त्यांच्या शहीदांना समर्पित केले आहे. त्या शहीदांचे स्वप्न आज पूर्ण झाल्याची त्यांची भावना आहे.
तर दुसरीकडे नेपाळच्या संविधानाने अतिशय लिबरल भूमिका घेत एलजीबीटी समुदायाच्या हक्कांचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य असल्याची तरतूद केली आहे. अशी तरतूद असणारे नेपाळ हे अशियातील पहिले व दक्षिण अफ्रिका आणि इक्वॉडोरनंतरचे जगातील ३ राष्ट्र ठरले आहे.
नेपाळचे हे नवे संविधान आता तिथल्या नागरिकांसाठी स्थैर्याचे नवे किरण बनू शकेल काय याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल. पण सध्या तरी नेपाळच्या स्थैर्यासाठी या संविधानाला शुभेच्छा.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Tuesday, September 15, 2015

जैविक शेती काळाची गरज,

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Thursday, May 21, 2015

दुष्काळही मला एफ. सी. रोडवर भेटला

मे महिना नुकताच सुरू झालेला, परिक्षा चालू होत्या. दिवसभर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या भूमिका असणाऱ्या लोकांची तीन व्याख्याने एेकण्याची संधी आज परत एकदा मिळाली होती. पुण्यप्रसन वाजपेयी, अजित अभ्यंकर, विनय सहस्त्रबुद्धे...

रात्रीचे ११ वाजलेले, रविवारच्या दिवशी लाखो पाऊले आपल्या अंगावर घेतलेला एफ.सी रोड शांत झाला होता. मोजके हॉटेल चालू होते. काही बंद होण्याची तयारी करत होते. दिवसभर लोकांसमोर भीक मागणारे हात आता फूटपाथवर शांत पडलेले होते. 

रविवारी मेस बंद , त्यातच महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे खिशात थोडे फार पैसे असल्याने कुमठेकर रस्त्यावरचा मिलन खानावळीमध्ये कोल्हापूरी रस्स्यासोबत जेवणाचा बेत उशीरा का होईना यशस्वी झाला होता. कुमठेकर रोड, झेड ब्रिज, डेक्कन बस स्टॉप, गुडलक करत पायं रूम कडं चालत होती. सोबत मित्र अजय होता. सतत अबोल असणारा अजय आज जेवताना भरभरून बोलला होता. त्याच्या कामाबद्दल, लोकं करत असलेल्या अवास्तव अवाढ्व्य खर्चाबद्दल तो खुलून बोलला होता. त्या आनंदात रूम कडं चाललो होतो. गुडलक चौकात भांडारकर रोडच्या सुरूवातील पोलिसांकडून गाड्यांची तपासणी चालू होती. 

डेक्कन कडून प्रयाग हॉस्पिटल समोरून आल्यावर गुडलक चौकातून उजवीकडं वळालं की लगेच सोनवणेंचा बुक स्टॉल लागतो. नुकताच दहा वर्षानंतर सीपीएम च्या केंद्रिय स्तरावर बदल होवून सीताराम येचूरी नवे सचिव बनले. त्यावर आधारित तहेलका या मासिकाचा अंक बाजारात आला होता. पण तरूण तेजपाल प्रकरणानंतर पुण्याच्या मोजक्याच स्टॉलवर अंक उपलब्ध असतो, त्यामुळे मिळायची मारामार असते. रात्री ११ वाजता चालू असलेल्या सोनवणे च्या स्टॉलवर चालत चालत चौकशी केली अंक आहे का? अंक होता. तहेलका चा अंक वाचणं म्हणजे एक सर्वांपेक्षा नवीन आशय वाचायला मिळणार याची खात्री...रूमवर जायची वाट कशाला पहायची म्हणून अंक चाळत चाळतच हॉर्न ओके प्लीज समोरून रस्ता क्रॉस करून आर्यभूषण प्रेस कोपऱ्यावरच्या गोखलेंच्या पुतळ्यापासून रानडे इन्स्टिटयुट कडं फूटपाथ वरून चालायला सुरूवात केली. अंक चाळता चाळता सीताराम येचूरी यांच्या विषयी अजय सोबत चर्चा चालू होती. आर्यभूषण च्या कोपऱ्यावरील वडापाव वाला आता गाडा आवरायच्या तयारीत होता. अजय रस्त्याच्या बाजूने आणि मी आर्यभूषण प्रेसच्या कंपाऊंडच्या बाजूनं चालत निघालो होतो. रानडे इन्स्टिटयुटसमोरच्या पीएमपीएमएल च्या बसस्टॉपवर तुरळक गर्दी होती. बसस्टॉप सुरू व्हायच्या कोपऱ्यावर एक १२ १३ वर्षाचा पोरगा, चेहरा काळा पडलेला, कपाळावर टिळा लावला होता, रस्त्याकडं तोंड करून बसलेली, आम्हांला पाठ करून बसलेली बँग घेऊन बसलेली बाई कदाचित त्याची आई असावी, तिच्या मांडीवर एक लहान लेकरू दिसत होतं.

अजय रस्त्याच्या बाजूनं चालत असल्यामुळे त्या पोरानं अजयला थांबवलं आणि अजयला म्हणाला "भाऊ, एक मिनिट".
आता माझं कॉलेज एफ सी रोड वर असल्याने याची दररोज सवय झालेली. एफ. सी रोड असे कित्येक लोक लहान पोरं अश्या परिस्थित वावरत असतात. पण एवढ्या उशीरा हा पोरगा विचारतोय म्हणंटल्यावर थोडं पुढं गेलेला मी वापस आलो. विचारलं "काय". पोरगा म्हणाला "दुसऱ्या गावावरून आलोय, पैसे नाहीत, दहा रूपयं द्या भाऊ". मी मराठवाड्यातला असल्यानं त्या पोराच्या भाषेचा टोन मराठवाडी वाटला. आत्ताच जेवण झालेलं, त्यात तो तहेलका चा अंक घेतलेला त्यामुळं खिशात जेमतेम पैसा उरलेला. आता तो पोरगा खरं बोलतोय का? याचा विचारही मनात आला नाही आणि हात आपोआप खिश्याकडं गेला. काढून १० रूपये दिले त्या पोराला. पैसे देताना नजर त्याच्या आईकडं गेली आणि दहा रूपयात तिघांचं काय होणार हा विचार मनात येऊनच गेला. मग त्या पोराला म्हंटलं चल इथं कोपऱ्यावर वडापाव मिळतो घेऊन देतो. बसस्टॉप ते आर्यभूषण कोपऱ्यावरचा वडेवाला यांच्यातलं अंतर १० सेकंदाचं. त्याची आई ओरडत होती तिकडं कुठं जातोस इकडं स्टेशनकडं जायचंय आपल्याला. पोरानं माईला सांगितलं वडापाव आणतो म्हणून..मग त्याला विचारलं कोणत्या गावचा, इकडं कसं काय?
पोरगा म्हणाला "परभणी" मला त्या भागात फिरल्यामुळं थोडीफार माहिती. म्हणून विचारलं परभणीचा कुठला. त्यानं लगेच उत्तर दिलं गावाचं नाव सांगितलं आणि म्हंटला जिंतूर जवळ गाव हाय. इकडं कसं काय विचारलं तर म्हणाला " आमच्याइकडं दुष्काळ पडलाय, काम नाही काही म्हणून काम बघायला आलोय इकडं"
मी ही मराठवाड्यातला. मराठवाडा आणि दुष्काळ यांचं जिव्हाळ्याचं नातं. आम्हीही लहानपणी उन्हाळ्यात सोसायटीतल्या पाण्याच्या टाकीवर पाण्यासाठी रांगा लावून बसायचो. मागील पाच सहा वर्षापासून लातूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. त्यामुळं दुष्काळाची तीव्रता काही जाणवत नाही. ८ १५ दिवसाला पाणी येतंय. मग घरातले लहान मोठ्या भांड्यासह २ ३ बँरेल हौद आम्ही आजही भरून ठेवतो. मागील चार वर्षापासून पुण्यात आहे. त्यामुळं दुष्काळ या शब्दाचा संबंध फक्त पेपर वाचताना आणि रानडेच्या कँन्टीनमधल्या चर्चांमध्येच यायचा. मागच्या डिसेंबरमध्ये गावाकडं गेलतो तेव्हा ओसाड पडलेली शेतं पाहून बाप म्हणाला होता यावर्षी अवघड आहे लय. ऑक्टोंबर पासून एवढं अवघड असून सुद्धा, लातूरला गेल्यावर पेपरमध्ये वाचलेल्या आत्महत्या वाचूनसुद्धा माध्यमांना आणि मलाही दुष्काळ जाणवतच नव्हता. कारण पुण्यात कसला आलाय दुष्काळ, पेपरमध्ये कुठंतरी कोपऱ्यात आलेल्या दुष्काळाच्या आणि आत्महत्येच्या बातम्या तीव्रता कमी करत होत्या. सगळं कसं आलबेल चाललंय हे दाखविणं चाललं होतं. दुष्काळासंबंधीच्या माहितीचाच माध्यमात दुष्काळ पडलाय असं वातावरण सगळं आजूबाजूला...

आणि आज हा दुष्काळ एका आक्राळ विक्राळ स्वरूपात मला माझं खरं रूप जागा दाखविण्यासाठी एफ सी रोडवर भेटला होता. दुष्काळ म्हंटलं की स्थलांतर आलंच. १९७३ ७४ पासूनच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातून स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं. हे स्थळांतर पुण्याकडं अधिक. पिंपरी चिंचवड, भोसरी काळेवाडी कात्रज हडपसर भागात बहुतांश मराठवाड्यातलीच लोकं. दुष्काळात आलेले. आजही मराठवाड्याचं भीषण वास्तव आपल्याला माहित नसलं तरी पुण्यात येणारे लोक थोडंच थांबणार आहेत. विकासाचं केंद्रिकरण झालं की लोकसंख्याही तिकडं केंद्रित व्हायला चालू होते. असो.

बोलता बोलता वडापावच्या गाड्यावर आलो. वडापाव वाला ओळखीचा. साहेब पाव नाहीत सांगू लागला. मग म्हणाला फक्त वडा देवू का? वडा घेऊन परत वापस फिरलो, त्या पोराला विचारलं शिक्षण किती झालं. त्यानं उत्तर दिलं चौथी.
आता काय काम करणार विचारल्यावर म्हणाला बघू जिथं भेटंल तिथं करीन. सलग दोन दिवसाचं काम भेटलं तर रूम करीन, आत्ता मात्र झोपायला स्टेशन वर.
त्याचं बोलणं ऐकून आवसान निघून गेलेलं. कसं जगत असतील हो ही माणसं. दुष्काळावर दुष्काळग्रस्त भागात न राहता बोलणाऱ्या आपण सर्वांना खरंच जगण्याची अस्तित्वाची ही धडपड आपल्या माध्यमात लिखाणात साहित्यात तेवढ्याच प्रखरपणे मांडता येईल का?
शेवटी न रहावून विचारलं बाप कुठं हाय. म्हणाला गावाकडं तो नाही आला इकडं.
एवढं बोलेपर्यंत बसस्टॉप आलता. मग तो फूटपाथवरून उतरून रस्त्यावर बसलेल्या आईकडं गेला. मी आणि अजय मात्र हादरल्यासारखं पुढं निघालो. कदाचित हे हादरणं फक्त सुरूवात होती काही मनातले बुरूज शिल्लक असतील म्हणून की काय पुढं अजून घडायचं बाकी होतं.
रानडेच्या गेटसमोर पोहचतो न पोहचतो तर तोच पोरगा त्याची माय आवाज देत आले. तोंडावर गोंदल्याच्या खूणा स्पष्ट दिसत होत्या गळ्यात फक्त काळा दोरा दिसत होता. पोराच्या खांद्यावर बँग होती. बँगचे खालचे दोन्ही कोपरे फाटलेले त्यातून आतले कपडे बाहेर लोंबत होते.
बाई म्हणाली "इथं जवळ दवाखाना हाय का, कमरेवरच्या लेकराकडं पाहत म्हणाली. पोराला लय ताप आलीय." तिच्या त्या बोलण्याने काहीच कळेनासं झालं. एक तर रात्रीचे ११ वाजलेले त्यात एफ. सी रोड वर एखादा दवाखाना आठवण्याची क्षमताच राहिली नव्हती. त्यात त्यांच्याकडं खायला पैसे नव्हते मग दवाखान्याचं कसं...मनात अनेक प्रश्न अस्वस्थता निर्माण झाली होती. अजयही शांतच होता पण त्याच्याही मनातली अस्वस्थता काही लपत नव्हती. थोड्याच वेळापूर्वी जेवताना तो बोलत होता, वाढदिवसांच्या इव्हेंटमध्ये होणारी उधळपट्टी पाहवत नाही...
कदाचित त्या बाईला हे सगळं मनातलं जाणवलं असावं. ती म्हणाली,"दवाखाना सांगा, डॉक्टर ला बोलते मी जे बोलायचय ते".
माझ्या तोंडातूनही लगेच प्रयाग हॉस्पीटलचं नाव निघालं. त्यांना पत्ता सांगितला. थोडे फार पैसे द्यावे म्हंटलं तरी खिशात पैसा नव्हता. रानडे इन्स्टिटयुटपासून रस्ता क्रॉस करत वाडेश्वर कडून प्रयाग हॉस्पीटलकडं दिशेने ते तिघं निघाले होते. कंबरेवरचं ते पोर डोळ्यात डोळे टाकून माझ्याकडं दूरवर जाईपर्यंत पाहत होतं. त्याचे ते माझ्याकडचं पाहणं आज २० दिवसानंतरही जसच्या तसं आठवतंय मला...
विकास असाच जर एफ सी रोड भोवतीच केद्रिंत होणार असेल तर कदाचित कधी ना कधी दुष्काळाच्या झळाही आम्हांला याच एफ सी रोड वरच जाणवल्याशिवाय राहणार नाहीत.. दिवसभरात तीन व्याख्यानामध्ये दुष्काळ कुठंच जाणवला नाही. दिवसभर तीन व्याख्यानं परत आवडतं मासिक भेटलं यातच समाधान मानून झोपण्याच्या आरामाच्या तयारीत असताना आपली झोप उडावी असा अनुभव यायलाच हवा...कदाचित आपल्या व्यवस्थेचं पण हेच झालंय...मुख्य समस्या कुठंच जाणवत नाहीयेत. आणि ज्या समस्याच नाहीयेत त्याच समस्या समजून आपण प्रयत्न करत असतो आणि त्याचाच आनंद साजरा करण्याच्या तयारीत असतानाच हादरा देतं कोणी तरी....मग येते अचानक एकदम खडबडून जाग....

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Tuesday, February 17, 2015

परत एक दहशतवादी हल्ला

       काल रात्रीच "पेन हत्यारापेक्षा कशी ताकदवान असते" या संबंधीचा एक निबंध वाचत होतो. आणि आज सकाळी दहाच्या सुमारास फोन मेसेजेस् येऊ लागले, कोल्हापूरमध्ये कम्युनिस्ट नेते विचारवंत लेखक कॉ.गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी कॉ.उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाला आहे. दोघांनाही गोळ्या लागल्यात आणि परिस्थिती गंभीर आहे याची जाणीव व्हायला वेळ लागला नाही.
       तेवढ्यात लहानपण आठवायला सुरूवात झाली. घरात पुस्तकाच्या कपाटात खूप सारी पुस्तकं होती आजही त्यात भरच पडत आहे. मग त्या सगळ्यातून एक पुस्तक लक्ष वेधून घ्यायचं, पांढरं कव्हर त्यावर जाडजूड अक्षरात लिहिलेलं नाव आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. मोठ्या मोठ्या पुस्तकांपेक्षा हे ५० ६० पानांचं पुस्तक हातात घ्यायला वाचायला बरं वाटायचं. समजत काही नव्हतं पण वाचायचं तसंच. ते पुस्तक होतं गोविंद पानसरे याचं "शिवाजी कोण होता?". पहिली ते चौथी पर्यंतच्या राज्य शासनाच्या पुस्तकातून भवानी मातेने तलवार दिलेल्या शिवाजीची  ओळख तर झाली होती पण "जाणता राजा" शिवाजीची ओळख पानसरेंनी राज्यातल्या माझ्यासारख्या लाखोंना करून दिली असेल.
         पण आज दाभोळकरांपाठोपाठ दाभोळकरांच्या हत्येसारखाच पानसरेंना संपविण्याचा कट रचण्यात आला. त्यामधल्या काळात पुण्यात सीपीएमच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता. महाराष्ट्रातील हल्ल्यांची ही मालिका संपायचं काही चिन्ह आज तरी दिसत नाहीये. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांनी कट्टरधर्मींयांनी थैमान घातले आहे. मग त्यात पेशावर, चार्ली हेब्डो सारखी ताजी उदाहरणं आहेतच. त्याचा निषेध करण्यासाठी आमच्या हिंदूस्थानवासीयांचा उत्साह शिगेला गेला होता. जसं मुताऱ्यांच्या भिंतीवर कागदं चिकटावून घाण भिंती तयार होतात तश्या आमच्या फेसबुक वॉल निषेधानं भरल्या होत्या, का ? तर मुस्लीम ना?.तसं पाहिला तर गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्यावर हल्ला करणारे मुस्लिम नव्हते ना म्हणून आमच्या साठी हे हल्ले दहशतवादी वाटतच नाहीत. तर दुसरीकडं आमच्या या देशात सामाजिक कार्यकर्त्यांचे, विवेकवादी विचारवंतांचे समाजातील दलित शोषितांचे सातत्याने खून होत होते. काही खून समोर आले तर काही तसेच पचवले गेले. त्यामुळे धर्माच्या नावावर चालू असलेल्या या हत्यांचे काय? ज्याप्रमाणे २६/११ चा दहशतवादी हल्ला देशासाठी घातक होता तेवढेच घातक दाभोळकर पानसरे यांच्यावरचे हल्ले. बाहेरच्या जगात जे चालू आहे ते दहशतवादी आणि आमचं म्हणजे राष्ट्रवादी ? असं कसं चालेल ना.
         आज पानसरेंवर झालेला हल्ला देखील परकिय राष्ट्रविघातक शक्तींनी केलेल्या हल्ल्या एवढाच तीव्र दहशतवादी हल्ला होता. फरक एवढाच बाहेरचे एका विशिष्ट धर्माचे आहेत तर आतले देखील एका विशिष्ट धर्माचेच आहेत. फरक आहे तो फक्त धर्माच्या नावाचा. विशिष्ट राष्ट्रनिर्मितीच्या रस्त्यात ज्यांनी कम्युनिस्टांना नंबर एकचा शत्रू मानलं आहे तेव्हा पूर्ण राजकीय शक्ती हातात आल्यानंतर स्वप्न पूर्ण करायचे प्रयत्न तर होतीलच ना. त्यामुळे भविष्यात असे अनेक दहशतवादी हल्ले पहावयास मिळतीलच. पण एक गोष्ट नक्की आहे, ८२ वर्षाच्या वृद्धास गोळ्या घालण्याची गरज जेव्हा जाणवत असेल तेव्हा त्या गोविंद पानसरेंच्या विचारांची लेखनाची ताकद लक्षात येते. आजही या देशातील डावे लोक एक सक्षम वैचारिक पर्याय म्हणून जातीयवादी धर्मांध व भांडवली शक्तीपुढे उभे आहेत. कोणी कितीही ओरडलं की डावे संपले आहेत तरी सर्व सत्ताकेंद्रे हाती असताना असे भ्याड हल्ले करून समतावादी मानवकेंद्री विचार मांडणारे लोक आजही लढा देत आहेत आणि ते विचार आपल्याला काही सहजासहजी अराजकता माजवू देणार नाहीत म्हणून हे दहशत पसरविण्यासाठी दहशतवादी हल्ले चालू आहेत. या अशा हल्ल्यांमध्ये फक्त हल्लेखोरच नाही तर इथल्या लोकशाही धर्मनिरपेक्ष विचारांना मारक असणाऱ्या प्रवृत्तींना निवडून देणाऱ्या आपल्या सगळ्यांचेच हात दाभोळकर पानसरे यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत, आपण सगळेच दहशतवादी आहोत. पण मानवी कल्याणाचा लढा हा सातत्याने चालणारा खंडित न होणारा लढा आहे. त्यासाठी अनेकांचा जीव गेलेला आहे हत्या झालेल्याच आहेत होतीलही पण विचार आजही जिवंत आहेत मग ते विचार क्षत्रियासारखेच असावेत कारण ते संपविण्यासाठी परशूराम नावाच्या गृहस्थाला २१ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करावी लागली होती म्हण त्यामुळे आमचे हे विचार संपविण्यासाठी गोडसेंची फौज देखील कामाला लावली तरी विचार काही समूळ नष्ट होणार नाहीत. त्या विचारांचे अंकूर उगविल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही धर्मनिरपेक्ष नसलेलं सरकार सत्तेत असलं तरी पानसरे व चुकून मोकून सापडले तर दाभोळकरांच्या हल्लेखोरांना देखील ते लवकरात लवकर पकडतील व शिक्षा देतील व  बाह्य दहशतवादावर बोंबा मारणाऱ्या तथाकथित राष्ट्रप्रेमींसमोर अंतर्गत दहशतवादाचा खरा चेहरा उघडा करतील, संस्कृतीच्या नावाखाली जीव घेणाऱ्यांचा बुरखा फाडतील अशी अपेक्षा करण्यात चूक नाही. शेवटी विवेकाचा आवाज बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही.
       लोकशाही धर्मनिरपेक्षता जिंदाबाद!

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/