Sunday, July 27, 2014

एसपीचा शोध...

१२ जुलै  २०१४. वार-शनिवार, पहाटेच मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांचा फोन आला. पोलंडचा एक पत्रकार आलाय. त्याला खर्ड्याची केस अभ्यासायची आहे आणि लगेच खर्ड्याला जायचंय. आम्ही मुंबईतून निघतोय. तू तयार हो. हा त्यांचा निरोप. 
 पावेल गुला हा मूळ पोलंडच्या. तो पत्रकार, चित्रपट दिग्दर्शक, माहितीपट निर्माता आहे. सध्या अनेक देशांत फिरून ऑनर किलींगच्या घटनांवर लघूपट बनवतोय. त्या अनुषंगानं खर्ड्याची केस त्याला ही केस अभ्यासायची होती. छायाचित्रण करायचं होतं. खर्ड्याला जाऊन नितीन आगेचे आई-वडिल, त्याचसोबत तपास अधिकाऱ्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या. 
दुपारच्या वेळी अहमदनगरला पोहचलो, नितीनचे वडील ठरल्याप्रमाणे नगरला आले होते. त्यांच्याशी केस व तपासासंदर्भात चर्चा झाली. मुलाखत झाली. मुलाखतीतून येणारे व्यस्थेबद्दलचे धक्कादायक अनुभव कॅमेर्यात कैद होत होते.
 कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर दिली आहे, ते पोलिसच जेव्हा कायदा मोडतात तेव्हा पिडितानं दाद मागायची तरी कोणाकडं ? केसचा तपास आरोपी आणि प्रशासन यांच्या संगनमतानेच चाललाय की काय ? कायद्याची व न्यायव्यवस्थेची धिंड काढण्याचं काम सरकार व पोलिस करत आहेत का ?असे एक ना अनेक प्रश्न या मुलाखतीनं आणि पुढं लिहीलेल्या अनुभवांनी निर्माण केले होते.
आम्ही गेलेल्या शनिवार व रविवार या दोन दिवसात काय घडलं ? हे सांगण्यापूर्वी  त्याच्या अगोदर ही केस नक्की काय आहे ते पाहुयात. २८ एप्रिल २०१४ ला नितीन आगे या १७ वर्षीय मुलाचा जातीयवादी वृत्तीच्या लोकांनी निर्घृन खून केला होता. त्याच दिवशी त्याचा मृतदेह गावाजवळच्या एका टेकडीवरच्या झाडाला लटकविण्यात आला व हत्येला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सांगणं यासाठी, की आजच वर्गामध्ये खर्ड्याला काय घडले ? हे पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या माझ्या काही विद्यार्थी मित्रांना माहिती नव्हतं.  दलित अत्याचार आणि माध्यमं हा वेगळा महत्त्त्वाचा विषय आहे. त्यात जायला नको.
28 एप्रिलच्या रात्री नितीनचं पोस्टमार्टम झालं. वारंवार मागणी करूनही हा रिपोर्ट नितीनचे वडील राजू आगेंना देण्यास तपास अधिकारी टाळाटाळ करत होते. राजू आगेंनी त्यासाठी केलेले अर्ज त्यांनी दाखविले. अट्रॉसिटीची केस असल्यामुळे प्रकरणाचा तपास उपाधिक्षक स्तराच्या अधिकाऱ्याकडे आहे. या पोलिस उपाधिक्षकाने चार अर्ज करून सुद्धा हा रिपोर्ट देण्यास टाळाटाळ केली. शेवटी सुबोध मोरे व पावेल गुला यांनी जाऊन या पोलिस उपाधिक्षकासोबत वाद घालून हा रिपोर्ट राजू आगेना मिऴवून दिला. त्याचं चित्रण पावेल कडं उपलब्ध आहे. पोलिस का रिपोर्ट देत नव्हते ? त्यांच्यावर कोणाचा दबाब आहे ?  हे प्रश्न आजही खैरलांजी सारखे अनुत्तरित आहेत.
ज्या माणसानं इतक्या क्रुरपणे आपला मुलगा गमावला आहे त्याला सहकार्य तर सोडाच उलट तपासणी यंत्रणा त्यांना मानसिक त्रास देण्यात तत्पर ठरत होती. ही यंत्रणा नितीनला न्याय मिळवून देईल, या बद्दल मी तरी शाशंक आहे.    
अशा घटनेत कायद्यानुसार 60 दिवसांच्या आत चार्जसिट दाखल होणे गरजेचं होतं. घटना घडून अडीच महिना उलटून गेला तरी नितीनच्या आईचा जबाब पोलिसांनी नोंदविलेला नव्हता. नितीनच्या मृत शरीराचे पोलिस पंचनाम्यातील फोटो पालकांना भेटले नाहीत, आय विटनेस घेतले गेले नाहीत. 
राज्यात गाजलेल्या  अशा प्रकरणात पोलिसांची भूमिका इतकी संशयास्पद असेल तर बाकी प्रकरणात काय? राजू आगेंनी तक्रारींचा हा पाढा वाचून दाखविल्यावर महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे पोलिस राजू आगेंना भेटत नाहीत आणि तपासा संदर्भात माहिती देत नाहीत. एकूणच पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रकार सुरू आहे असं जाणवले.
12 तारखेला पोलिसांनी कायद्याचा मांडलेला खेळ आणि मृत नितीनच्या वडिलांना मिळणारी वागणूक याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे एस. पी. यांना देण्याचं ठरलं व कारवाई करण्याची मागणी करणारा अर्ज देण्याचं ठरलं. राजू आगेंचा तक्रारीचा अर्ज एस. पी. ना देण्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफीसला गेल्यानंतर कळलं की, एस. पी. गुरूपौर्णिमेच्या बंदोबस्तासाठी शिर्डीला गेलेत. तर दुसरीकडे तपास अधिकारी मेडीकल लिव्ह वर होते. पी. एम‌. रिपोर्टच्या प्रकरणानंतर हे महाशय लगेच मेडीकल लिव्ह वर गेले होते.
महिती देण्यासाठी व अर्ज स्विकारण्यासाठी अहमदनगर पोलिसांकडं एकही अधिकृत व्यक्ती त्या दिवशी उपलब्ध नव्हती. एसपी,  डीवायएसपी  कोणीच फोन उचलत नव्हते. वाट पाहून, फोन ट्राय करून उपयोग नसल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही थेट अहमदनगर पोलीस  कंट्रोल रूम गाठली.  तत्पूर्वी शिर्डीत असणाऱ्या काही पत्रकारांशी संपर्क केल्यानंतर कळालं, की एसपी तर तिथं नाहीयेत, मग प्रश्न निर्माण होतो एसपींच्या पीए ला साहेब कुठं आहेत हे माहित नव्हते की एसपी देखील या पोलिसांना पाठीशी घालत होते व त्यामुळंच भेट टाळत होते. हे सगळं षड्यंत्र लक्षात येत होतं. 
पोलिस कंट्रोल रूममध्ये गेल्यावर त्यांना सांगितलं, की एसपींना भेटायचं आहे किंवा कमीत कमी फोन वर संपर्क करून द्या. त्यांची भेट झाल्याशिवाय आम्ही कंट्रोल रूम मधून हलणार नाही. या सर्व घडामोडींचं चित्रण माझ्याकडं उपलब्ध आहे. 
आमच्या या न हलण्याच्या भूमिकेमुळं उपस्थित पोलिसांनी एसपीचा शोध सुरू केला. आश्चर्य वाटेल जिल्ह्याच्या कंट्रोल रूम मधून 100 ते 120 फोन करून, 3 तास एसपीचा संपर्क होत नव्हता. आता या ठिकाणी जर एखादी बिकट परिस्थिती असती तर, पण ही तर दलित अत्याचाराची केस ना. कंट्रोल रूम मधून सगळीकडं संदेश पाठवले जाऊ लागले होते. एसपींच्या अंग रक्षकांपासून ते त्यांच्या वैयक्तिक मोबाईलवर कॉल ट्राय करणं चालू होतं. पण एसपी मात्र सापडत नव्हते. परदेशी पत्रकारासमोर एसपीला संपर्क साधण्याची कंट्रोल रूममधील कर्मचाऱ्यांची केविलवाणी धडपड चालू होती. एकंदरीत एसपी आम्हाला टाळत होते, हे लक्षात आलं होतं. दलितांच्या केसेस मध्ये महाराष्ट्रातील पोलिसांच्या भूमिकेबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या आणि त्या दिवशी  त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो.
 जातीय अत्याचाराच्या एवढ्या महत्त्वाच्या केसमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकाराला, मृताच्या पालकांना तपासाबद्दल माहिती द्यायला, त्याच्या तक्रारी ऐकून घ्यायला एसपींना वेळ नसणे ही संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांसाठी शरमेची व मान खाली घालायला लावणारी बाब होती. यातून तपास यंत्रणेचं जातीय चरित्र स्पष्टपणे दिसत होतं. 
शेवटी पोलिसांनी आम्ही काही हलत नसल्याचं पाहून शहर पोलिस उपाधिक्षकांना पाचारण केले. त्यांनी तक्रार अर्ज स्विकारला. तरी आम्ही एसपींना भेटण्याच्या मागणी वर ठाम होतो. शेवटी नाईलाजानं या साहेबांनी एसपींच्या प्रायव्हेट नंबर वर फोन केला.
आता जे घडले ते महत्त्वाचे आहे. या साहेबांनी फोन केल्यावर एसपींनी आम्हांला उत्तर दिलं, की मी परदेशी पत्रकाराला सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय भेटू शकत नाही, हे लेखी स्वरूपात द्यायला त्यांनी अपेक्षेप्रमाणे टाळाटाळ केली. म्हणजे सरकारमधील कोण व्यक्ती आहे जी पोलीस अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलू देत नव्हती ? 
 आमच्या रेट्यामुळं त्यांनी सुबोध मोरे, राजू आगे व मी असा लोकांना पुढच्या  दिवशी (रविवार, 13 जुलै ) भेटण्याचं मान्य केलं. पावेल सोबत नसेल या अटीवर. शहर उपआधिक्षकांनी त्यांची वेळ व भेट घडवून देण्याचं आश्वासन दिले.
त्या क्षणापासून आत्ता पर्यंत एसपी व शहर पोलिस उपाधिक्षक आम्हांला भेटतच आहेत. ज्यांनी भेट घडवून आणायचं मान्य केलं होतं त्यांना ठरलेल्या दिवशी 20 ते 30 फोन, आठवण करून देणारे 5 ते 6 संदेश पाठविले. त्यांनी ना फोन उचलला ना मेसेजचा रिप्लाय केला. आम्ही मात्र पुढचा नाशिकचं शूट रद्द  करून नगरला  थांबलो. दोन दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिलो. 
अशी आहे दलितांच्या केसेसमध्ये  तपास यंत्रणांची व सरकारची भूमिका. आमचा मात्र अहमदनगर एसपींचा शोध अजून सुरूच आहे. सदर  एसपी व  शहर उपाधिक्षक कोणाला भेटले तर या प्रकरणाची आठवण करून द्या. कोणाला त्यांचा नंबर हवा असल्यास मला मागा. लोकसत्तानं त्यांच्या वृत्तपत्रातून त्यांना आठवण करून दिली आहे. पण अजून फरक पडलेला नाही. न्यायासाठी आपण सर्व एसपीला शोधू या व जवाब विचारूया  ?
केस कधी कोर्टात उभी राहिल माहिती नाही. पण न्याय मात्र नक्कीच मिळणार नाही हे सध्याच्या परिस्थितीतून वाटतंय. केस कमकुवत करण्यात येत आहे. दलितांसाठी न्याय अजूनही नजरेत नाही. कारण व्यस्थेनंच तुमच्या विरोधात दंड थोपटलेत. असो न्याय व्यवस्थेवर विश्र्वास दाखवूयात... न्यायाची वाट पाहूया तर.




लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Wednesday, July 23, 2014

न्याय आणि समतेसाठी लाँग मार्च चालला


एका नामांकित  वृत्तपत्रांने मार्च संपल्यानंतर अनुभवात्मक लेख मागितला होता. पण नंतर त्यांच्या धोरणामध्ये कदाचित हा बसला नसेल व अजून प्रकाशित न झाल्यामुळे हे माध्यम वापरत आहे.....

दलित -अदिवासींच्या न्याय व हक्कासाठीचा  लॉन्ग मार्च



45 डिग्री तापमानात पायी चालणारे पंचवीश एक तरूण, खांद्यावर निळे व लाल झेंडे, चेहऱ्यावर अन्यायाविरुध्दची चिड व लढण्याची जिद्द आणि “नितीन आगे ला न्याय ला मिळाला पाहिजे”, “दलित- आदिवासींवर अत्याचार करणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तींचा व सरकारचा धिक्कार असो” “या जातीयवादी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय” असा घोषणा देत,  मिळेल त्या ठिकाणी मुक्काम करत, मिळेल ते जेवण करत, रस्त्यांवरील दलित – आदिवासी वस्त्यांवर जाऊन त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटना आणि जगण्याचे प्रश्न समजावून घेत, सभा घेत, अन्यायाविरूध्दची गाणी गात हे तरूण 250 किलोमीटर पुणे ते खर्डा पायी निघाले होते. कोणी पत्रकारितेचा, कोणी वकीलीचा विद्यार्थी, कोणी समाजशास्त्राचा, तर कोणी रंगकाम करणारा, कोणी पूर्णवेळ चळवळीत काम करणारा. तर कोणाची छातीची ओपन हर्ट सर्जरी झालेला, कुणाचे वय 21 तर कोणाचे 80 पण लढण्याची  जिद्द मात्र सारखी,
नितीन आगेच्या क्रुर हत्येनंतर दलितांच्या जगण्याचा व दलितांवरील अत्याचाराचा प्रश्र परत एकदा ऐरणीवर आला आहे.  समाज आपली मानसिकता बदलायला तयार नाही. माय – बाप समजल्या जाणाऱ्या सरकाराला या प्रश्रांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, उलट जातीय अत्याचाराच्या घटनांना सरकार खतपाणीच घालत आहे. दलित – आदिवासी अत्याचार विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. काही केसेस मध्ये तर एफआयआर मध्ये आट्रासिटी लावलेली असते तर दुसरीकडे चार्जसिटमध्ये ती नसतेच, म्हणजेच इथली न्याय व्यवस्था देखील दलित – आदिवसींना न्याय देत नाही. हे सर्व प्रश्र  लोकप्रतिनाधींनीं  सरकार दरबारी वा संसदेत मांडण्याची गरज आहे, पण देशाच्या संसदेत दलितांचे प्रश्र मांडायला ना दलित नेत्यांना वेळ आहे ना खंबीर दलित राजकीय पक्ष देशात आहे., उलट हीच संसद दलितांच्या हक्काचे बजेट राष्ट्रकुल सारख्या भ्रष्टाचाराचे गोदाम बनलेल्या खेळांकडे वळवते.  या सर्वांची चीड येऊन हा तरूण रस्त्यावर उतरला आहे. दलितांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना देखील या समाजाने माणूस म्हणून स्विकारायला हवे, या ध्येयाने न्याय व समतेसाठीचा लॉन्ग मार्च 22 ते 28 मे दरम्यान  या तरूणांनी काढला होता. या मार्चच्या आयोजनाची व त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली. या 250 किमीच्या प्रवासात आलेले काही अनुभव  व दलितांच्या अस्तित्वाचे विदारक वास्तव आपल्या समोर प्रतिनीधाक स्वरूपात मांडत आहे.  
  
लिंपणगाव आजही जळत आहे –
अहमदनगर जिल्हयातील लिंपणगाव, गावच्या बाहेर गायरानावर पारधी – भिल्ल – गोसावी – मातंगाची पन्नास एक घरं आहेत. 2012 मध्ये गावातील काही जातीयवाद्यांनी यां कुटूबांना  हुसकावून लावण्यासाठी ही पूर्ण वस्ती चोरीचा आळ घेत जाळून टाकली. हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले होते. पोट उपाशी ठेवून या लोकांनी बांधलेल्या घरांचे जळीत अवशेष आजही तेथे दिसतात. या वस्तीतील काहींचा जन्म याच ठिकाणचा, काहींचे  वय साठीच्या पुढे, तरी त्यांना या गावातले म्हणून गाववाल्यांनी स्विकारायची तयारी नाही. कारण फक्त या व्यवस्थेने त्यांना जातीच्या शेवटच्या पायरीवर ठेवलं होतं, ते दलित वा अदिवासी समूहापैकी आहेत म्हणून. ओसाड गायरान, कोणत्याही मुलभूत सुविधा या लोकांना मिळालेल्या नाहीत किंबहुना त्या त्यांना नाकारण्यातच आल्या आहेत. माध्यमांनी फक्त जळाल्यानंतर यांना लोकांसमोर आणले पण यांच्या जगण्याचे प्रश्नांना समाजासमोर आणण्यासाठी मात्र वृत्तपत्रांना व ब्रेकिंग न्युज वाल्यांना जागा भेटली नाही.  लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुण्या – मुंबईतील काहींची नावे मतदार यादीतून वगळळ्याचे समोर आले होते. मग त्यांना हक्क आठवले पण 60 वर्षापासून पिढ्यांपिढ्या या देशात राहून देखील या देशातील नागरिकांकडे ना रेशन कार्ड आहे ना मतदान कार्ड, ना घर आहे ना पाणी, तीन किलोमीटर वरून  डोक्यावर पाणी आणावं लागतंय. आजपर्यंत या गायरान जमिनी कायद्यानुसार त्यांच्या नावे व्हायला हव्या होत्या. पण सरकारी अधिकाऱ्यांना त्यासाठी वेळ नाहीये. दुसरीकडं याच गायरान जमिनीवर गावातील सवर्णांनी पक्की घरं बांधलेली दिसतात आणि हे सर्व प्रशासनाच्या संगनमताने, गायरान जमिनींवर पिढ्यांनपिढ्या राहत असलेल्या या जमिनीं अदिवासींच्या नावे कायद्यानुसार करायला हव्या होत्या. पण हे थोडंच कॅम्पाकोला आहे, हे तर खेडे त्याच प्रश्न दलित – आदिवासींचा. मग या सरकारकडं वेळ कसा असणार , तर दुसरीकडं याच गायरान जमिनींवर अनधिकृत बांधकामांना सरकारी वरदहस्त लाभतो.  वस्ती जाळणारे हे आरोपी आजही मोकाट या गावात फिरताना दिसतात. मग कुठं आहे देशातील कायदा, कुठं आहे समानता, आणि सरकार कुणाचं हा प्रश्न विचारत ही तरुणाई न्याय व समतेसाठी एक नवा लढा उभारत आहे. 

आदिवासी उपाशी,  आदिवासी मंत्री तुपाशी
काष्टी इथली सभा संपवून, लिंपणगावच्या आदिवासींचे वास्तव पाहून आम्ही पुढं निघालो, रस्त्यावर चालताना एक अलिशान इमारत दिसत होती, काहींनी तर्क काढला मंदिर असेल, काही म्हणत होते घर असेल. थोडं पुढं गेल्यावर एक पाटी दिसली, आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे निवासस्थान, एकीकडे आदिवासींना राहयला घर नाही, पिण्यासाठी पाणी नाही, सरकार म्हणतंय बजेट नाही,  तरी दुसरीकडं राज्याच्या आदिवासी मंत्र्यांच्या भव्यदिव्य राजवाड्यासारख्या निवासाचे बांधकाम चालू होते. एवढा पैसा येतो कुठून, हा पैसा आदिवासींच्या हक्काचा तर नाही ना याचे उत्तर या मंत्र्यांनी द्यायलाच हवे. स्वताला वारकरी व किर्तनकार म्हणविणारे हे गृहस्थानेव सरकारने नैतिकताच विकून खाल्ली आहे की काय ?  अशा प्रश्र या घरांकडं पाहताना उपस्थित होत होता. संवेदनाहीन बनलेले सरकार या व्यवस्थेने दाबलेल्या समाजघटकाला न्याय देणार कसा...(याच काष्टी गावामध्ये 22 जुन ला धनगर समाजातल्या मुलाला वरिष्ठ जातीतील मुलीवर प्रेम केले म्हणून पाचपुते नावाच्या लोकांकडून मारहाण झाली आहे.)

वालवड आजही मनुकाळातच
नगर जिल्ह्यातील छोटेसे गाव, ठरल्याप्रमाणे बैठक सुरू झाली. लोक त्यांच्यावरील जातीभेदाच्या अन्याय – अत्याचाराच्या विदारक घटना सांगत होते. स्वातंत्र्याची साठी ओलांडल्यानंतर सुध्दा या देशातील दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याची परवानगी नाही हे या देशातील पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरलेल्या काहींना खरं वाटणार नाही. पण वालवड सारख्या गावामध्ये हे आजही घडतंय. पाणी भरायला गेल्यावर गावातील माजलेला जातीयवादी समाज ज्यांच्याकडे गावातील अर्थिक व राजकीय मक्तेदारी आहे तो गावातील दलित स्त्रीयांना पाणवठ्यावर गेल्यावर, ये महारीन तू इथं कसं काय आलीस पाणी भरायला ? असा विदारक परिस्थितीत राहणाऱ्या समाजाला कुणाचे जरी अच्छे दिन आले तरी फरक पडणार आहे का हा विचार करावा लागतो.  ठरल्याप्रमाणे काहींना हे वाक्य सुध्दा जातीयवादी वाटणार नाही. पण हे वास्तव आहे महाशक्ती आणि विकासाकडे जाणाऱ्या देशाचे, मग कोणाचा विकास आणि कोणाच्या हक्कासाठीचे लढे हा प्रश्र उपस्थित राहतोच. जवळपास राज्यातील प्रत्येक गावात गावातील सांडपाणी हे दलित वस्तीकडेच सोडावं, असा अलिखित नियम (परंपरा) तयार झाला आहे त्याला हे गाव देखील अपवाद नव्हते. सरकारकडं तक्रारी केल्या तरी उन्मादातील सरकारला व प्रशासनाला या जातीयवादाच्या व स्वाभिमानाच्या प्रश्रांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मग भविष्यात वालवड मध्ये खैरलांजी, खर्डा वा सोनई घडल्यावरच पाच लाख रूपयांची भिक देण्यासाठीच लोकप्रतिनिधी जाणार आहेत का ? आत्ताच जर वालवड सारख्या गावातील दलितांवरील अत्याचारांचे प्रश्न निकाली नाही काढले तर भविष्यात त्याचे रूपांतर दलितांच्या क्रुर हत्याकांडामध्ये होऊ शकते. वेळीच गावागावतील अशा प्रवृत्तींना सरकारने ठेचून काढायला हवे, अशी अपेक्षा आपण लोकशाही वर विश्वास ठेवणारे लोक मागील अनेक वर्षांपासून करत आहोतच. त्याची सरकारने दखल घेतलीच पण ती त्या त्यांचा वंशपरंपरागत मार्गाने. हे प्रश्न सोडविण्याऐवजी  उलट  ते दाबून टाकण्याचेच काम सरकारने हाती घेतले ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेच्या माध्यमातून. तंटामुक्त गाव कार्यक्रम दलितांचे अत्याचार दाबण्याचे हे महत्त्वपूर्ण माध्यम बनत असल्याचे लोकांशी बोलताना जाणवत होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे दलितांची स्वातंत्र्यानंतरची सर्वात क्रुर हत्या करणाऱ्या  खैरलांजीला तंटामुक्ती गावचा पुरस्कार प्रदान केला. एकूणच सरकारच्या या सर्व जातीयवादी धोरणांमुळे लोकांच्या मनात रोष निर्माण होत असल्याचे गावोगावी जाणवत होते.  प्रत्येक गावातील लोक आम्हाला म्हणायचे आता किती दिवस मोर्चे काढायचे, आपणही आत्ता या जातीयवाद्यांना घरात जाऊन ठेचायला हवं. अजूनही सरकारच्या व जातीयवाद्यांच्या हे ध्यानात येत नसेल तर भविष्यातील या दलित – आदिवासींच्या उद्रेकाला हीच मंडळी जबाबदार असेल. आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या माध्यमातून हा शोषित वर्ग आजही संघर्ष करत आहे पण या संयम तुटण्या अगोदरच सरकारने पावले उचलली नाहीत तर मग फुले – शाहू – भगतसिंग - आंबेडरांनी दिलेला लढायचा मार्ग हा समाज अजून विसरलेला नाही.

सरकारची व प्रशासनाची भूमिका जातीयवादी
संविधानाच्या कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याची जबाबदारी असलेले राज्य सरकार व प्रशासन मात्र राज्यामध्ये जातीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात गुंतल्याचे चित्र फिरताना स्पष्टपणे जाणवत होते. एक गोष्ट आपण सर्वांनी ध्यायानात घेतली पाहिजे ती म्हणजे जातीय अत्याचार करणारा समाज हा राज्यातील सरकार, सहकार व  अर्थिक नाड्य़ा संभाळतो. म्हणूनच दलितांवर अत्याचार करण्याची त्यांची तयारी असते. त्यांचेच लोक मंत्री पदांवर असल्यामुळे यांना कायद्याचा धाक तसा कमीच वाटतो. लॉन्ग मार्च ला सुरूवात झाल्यानंतर लगेच या जातीयवाद्यांनी हा मार्च समाजात तेढ निर्माण करत असल्याचे सांगण्यास सुरूवात केली. मार्च जामखेड मध्ये पोचल्यानंतर प्रशासनाने मार्चला पुढे जाण्यास व खर्डा संसद घेण्यास परवानगी नाकारली. कारण होतं जमावबंदी चालू आहे. जामखेड मध्ये  पाटील नावाचे पोलिस अधिकारी भेटायला आले. बोलता बोलता हे अधिकारी देखील म्हणाले, तुम्ही समाजातील तेढ वाढवत आहात. म्हणजे दलितांच्या प्रश्नाबद्दल हे प्रशासन किती अनुकूल आहे. ते दिसून येते.  या उलट 10 मे ला जामखेड ला काही संघटनानी मोर्चा काढला होता की नितील आगेच्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचे काम चालू आहे. असा मार्चोंना मात्र जमावबंदी असताना परवानगी मिळते आणि पोलिस संरक्षणही. पण न्याय व समतेसाठी निघालेल्या या मार्चला हे सरकार अडविण्याच प्रयत्न करते. म्हणजे इथल्या दलितांनी  त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला विरोध देखील करायचा नाही, असे तर सरकारचे धोरण नाही ना अशी दाट शक्यता निर्माण होते. दलितांनी अत्याचार निमूटपणे सहन  करायचे हे या राज्यातील जातीचा कायदा राबविणाऱ्या सरकारचे धोरण यातून समोर आले. म्हणजे कायद्याच्या चोकटीत राहून काम करणाऱ्यांना आडवायचं, मारायचं आणि कायदा तोडणाऱ्या पाठीशी घालायचं, त्यांना पुरस्कार द्यायचे.  शेवटी लोकांच्या दबाबामुळे परवानगी नसताना ही खर्डा येथे नियोजित खर्डा संसद पार पडली. 

खर्डा संसद
देशाच्या संसदेमध्ये दलितांच्या प्रश्रांवर चर्चा होत नाही, म्हणून 28 मे ला दलितांच्या प्रश्रांचा लेखाजोखा मांडणारी खर्डा संसद भरविण्यात आली होती. राज्यातील कानाकोपऱ्यातून 4 ते 5 हजार दलित – आदिवासी या ठिकामी जमले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या वृंदा करात यांच्या उपस्थितीत ही संसद पार पडली.  दलित – आदिवासींवरचे अत्याचार  थांबविण्यासाठी त्यांना स्वाभिमानाचे जीवन जगता यावे या साठीचे अठरा ठराव यात मंजूर करण्यात आले.  त्यात जातीय अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अध्यादेश 2014' संसदेने मंजूर करून नियमित करावा.
 
राज्यातील जातीय अत्याचार प्रकरणाची व त्यांच्या खटल्यांच्या सद्यःस्थितीची श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. दलितांवरील अन्याय दाबणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव कार्यक्रम रद्द करावा.
ऑनर किलिंगच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी स्वतंत्र कायदा संमत करावा.
 "
पेसा' (पंचायत एक्‍सटेन्शन टु शेड्यूल्ड एरियाज ( कायद्याची राज्यात कडक अंमलबजावणी करावी.  दलित व आदिवासींचे गायरान जमिनींवरील 2010 पर्यंतचे हक्क नियमित करावेत, इत्यादी ठराव मंजुर करण्यात आले. 

लॉन्ग मार्च ने काय साधले
सुरूवातीच्या काळात सत्तेच्या दावणीला बांधलेल्या काही दलित पक्षाच्या नेत्यांना लॉन्ग मार्च स्टंट वाटला होता. पण शेवटी त्यातून जे साध्य झाले होते त्यामुळे त्यांना लॉन्ग मार्च काय होता हे कळायला मदत झाली असेल. जे साधले गेले त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लॉन्ग मार्च च्या माध्यमातून सरकारला व समाजातील जातीयवादी प्रवृत्तील असा संदेश गेला की, आम्ही आता आमच्यावरील व देशातील दलित – आदिवासी – भटके यांच्यावरील अन्याय- अत्याचार सहन करणार नाही.  स्वाभिमान व हक्कासाठीच्या नव्या लढ्याला या मार्च ने सुरूवात केली  आहे.  तरूणांमध्ये या अत्याचाराविरोधात चीड निर्माण करण्याचे काम या मार्च ने केले. अनेक अत्याचाराच्या घटना यानिमित्ताने समोर आल्या.  दलित व डाव्या चळवळीमध्ये लढण्याची ऊर्जा पेरण्याचे काम या तरूणांनी केले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जातीच्या मुद्दयावर लढण्यासाठी प्रथमच लाल आणि निळा झेंडा या मार्च मध्ये एकत्र आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने  या मार्च मध्ये सक्रिय सहभाग घेतला. हा या मार्च चे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. जातीयअन्ताचा लढा हा फक्त दलितांनी लढून यशस्वी होणार नाही तर अत्याचार करणाऱ्या समाजातील जातीतील घटक यात उतरायला हवेत  व ते या मार्च मध्ये उतरले होते. गावागावतील दलित शोषितांना आम्ही तुमच्या सोबत आहोत, त्यांना आपल्याही पाठीशी कोणीतरी असल्याची जाणीव या मार्चमुळे झाली.
एकूणच दलित अन्याय अत्याचाराच्या लढ्याला या मार्चने एक नवीन चेहरा, नवी ऊर्जा देण्यास सुरूवात केली आहे. हा लढा पूर्णपणे संविधानाच्या चौकटीत राहून चालू आहे. पण जर त्याचा परिणाम इथल्या जातीयवादी जनावरांवर दिसला नाही तर मात्र ही युवा पिढी त्यांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढायला मागे पुढे पाहणार नाही, आणि या साठी राज्याच्या गृहमंत्र्यांना कष्ट घ्यायची गरज पडणार नाही. अशा आरोपींना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढायची त्यांची इच्छा आम्हीच पूर्ण करू....दलित  - आदिवासी – श्रमिक  - कामगार या पुढे अत्याचार व शोषणाविरूध्द शांत राहणार नाही.




लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/