तीन दिवसांपूर्वीची घटना. 15 ऑगस्ट, सकाळचे दहा वाजले
असावेत. औरंगाबादहून पुण्याकडं निघालो होतो. बस अहमदनगर रोड लागली होती.
औरंगबादकडून नगरकडं निघालात की, शहर संपण्यापूर्वी रस्त्याच्या मधोमध ठेवलेला एक
रणगाडा (टैंक) लागतो. आजकाल टैंक म्हंटलं की, युद्धाचीही आठवण होत नाही आणि बॉर्डर
सिनेमाचीही. फक्त आठवण होते ती राष्ट्रभक्तीची आणि टैंकमार्फत ती रूजविण्याचा सिद्धांत
मांडणारे जेएनयूचे कुलगूरू जगदीश कुमार यांची.
सकाळी कॉलेजमधलं ध्वजारोहण आटोपून पुण्याकडं
निघायचं होतं. कॉलेजकडं जाताना सकाळी 7
च्या दरम्यान वगैरे सेव्हन हिल चौकात रस्ता ओलांडताना 30 – 35 दुचाकीस्वार पांढरं
शर्ट, त्यावर जॅकेट चढवून कर्णकर्कश हॉर्न वाजवत, अर्थात गाडीचा आणि तोंडाचा हॉर्न
वाजवत समोरून निघून गेले. गाडीवर उंचच्या उंच झेंडे लावले होते. त्यातल्या मागं
असलेल्या दोन तीन दुचाकीस्वारांना सगळ्यांच्या पुढं जायचं होतं म्हणून त्यांच्या
गाड्या नो एंट्रीतून घुसून रहदारीच्या विरुद्ध बाजूंनं जोरजोराचा हॉर्न वाजवत
निघून गेल्या. अर्थात हे सांगायचं म्हणजे ही होती यावर्षीच्या 15 ऑगस्टची माझी
स्वातंत्र्याची पहाट. दिवाळी पहाट सारखं स्वातंत्र्य पहाट असं कोणी काही करत नाही
ते एक बरंय म्हणा...
तर वापस अहमदनगर रोडकडं येवू. दरवेळी येता जाता हा
रणगाडा कठड्यानं बंदिस्त केलेल्या अवस्थेत तिथंच उभा असतो, एकटाच. त्याच्या जोडीला
असतात फक्त धूर सोडत आणि धूळ उडवत जाणारी वाहनं. 15 ऑगस्टला मात्र त्याला दुचाकी आणि चारचाकींच्या पार्किगनं आणि
त्यातून पांढरे कपडे घालून आलेल्या सेल्फी घेण्यात मग्न असलेल्यांनी वेढलं होतं.
त्याला बंदिस्त करणाऱ्या कठड्याच्या चारी कोपऱ्यावर तिरंगा लावण्यात आला होता. स्त्री
– पुरूष, लहान मुलं - मुली बिनधास्त त्याच्यासमोर उभारून सेल्फी काढत होती. काही
मंडळी फेसबुक प्रोफाईल पिक्चर आणि डिपीसाठी रणगाड्याला सॅल्यूट करतानाच्या पोझमधला
फोटो काढत होती. हे सर्व फोटो काढत होते, तेही 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी
म्हणजे त्यांच्यासाठी हा रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक बनलाय का ?
माझी बस 30 सेकंदात तिथून निघून गेली असेल. हे सगळं
पाहताना निर्माण झालेल्या प्रश्नांचं वादळ अजून शमलं नाही म्हणून हा ब्लॉगप्रपंच..
बेसिक प्रश्न पडलाय. अरे, रणगाडा, कोणत्या
स्वातंत्र्याचं प्रतिक असू शकतं आणि कसं. म्हणजे जगदीश कुमांरासाठी ते
राष्ट्रभक्ती रुजविण्याचा हत्यार असू शकतं. पण स्वातंत्र्याचा काय संबंध...
मला वाटतं रणगाडा प्रतिक आहे हिंसेचं, वर्चस्ववादाचं,
आक्रमणाचं, क्रुरतेचं आणि दहशतीचं. आपल्या मुर्खात काढण्यासाठी सांगण्यात आलेल्या
सामर्थ्याचं. रणगाडा म्हणजे एका अर्थानं यांत्रिक
दहशतवादीच. पण ते स्वातंत्र्याचं प्रतिक कसं ठरणार ?
स्वातंत्र्यदिनाचा आणि रणगाड्याचा काय संबंध.
कदाचित आपली स्वातंत्र्याची प्रतिकं बदलत चालली आहेत का ? सतत एकमेकांच्या स्वातंत्र्यावर
गदा आणणारी आपण मंडळी आपली नवीन वर्चस्ववादी स्वातंत्र्याची प्रतिकं तयार चाललोय का
? स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर
निघणाऱ्या प्रभात फेऱ्या दुचाकीस्वारांच्या त्या झुंडीत रूपांतरित होण्याचा अर्थ
काय ? ‘भारत माता की जय’चं रूपांतर
त्या दुचाकीस्वारांच्या दहशत निर्माण करणाऱ्या झुंडशाहीच्या ओरडण्यात होतंय ? झुंडशाही आणि स्वातंत्र्य या
पूर्णपणे एकमेकांविरोधी नाहीयेक का ?
आधुनिक पद्धतीनं पारतंत्र्यात जाताना स्वातंत्र्याची बदलती
प्रतिकं म्हणजे स्वातंत्र्यांबद्दलच्या आपल्या बदलत्या मानसिकतेची नव्यानं होत
जाणारी ओळख आहे. आपल्या लायकीनुसार आपल्याला सगळं मिळतं, सरकार, सिनेमा, कला, जीवन...जगदीश
कुमार आपल्या बदलत्या मानसिकतेचं तर प्रतिबिंब नाहीये ना.
औरंगाबाद शहराच्या सुरूवातीलाच हा टैंक आहे. तो टैंक
औलांडून जाणारा लगेच राष्ट्रभक्त होत असावा, म्हणजे औरंगाबादमधले सगळेच
राष्ट्रभक्त. तोच रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक बनला असेल तस्लीमा नसरीनच्या
स्वातंत्र्यांचं काय... स्वातंत्र्याच्या सकाळचा हा अनुभव अनेक प्रश्नांना जन्म
देवून जातोय. अनेकांच्या डोक्यात अनेक प्रश्न पडले असतील. पुण्यात पोहचल्यावर
अनेकांना बोललो ही याबद्दल पण स्वातंत्र्याचं प्रतिक रणगाडा ? याचं उत्तर मात्र मिळत नाहीये. जर रणगाडा स्वातंत्र्याचं प्रतिक असेल तर
सरकारनं आता यापुढं युद्धासाठी रणगाडे न बनवता सरकारी कार्यालयं, चौक, सिनेमागृह, शाळा,
कॉलेजांमध्ये बसविण्यासाठी त्यांची निर्मिती करायला हवी...
