Friday, January 22, 2016

Drought Memory 1 : पाणीवाला

तुमच्याकडे नगरसेवकाचा, आमदार – खासदाराचा नंबर नसला तरी चालेल, पण पाणीवाल्याचा नंबर असायलाच हवा. राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवरील जनरल नॉलेज नसेल तरी चालेल पण तुमच्या भागातील पाणीवाला कोण ? याची माहिती तुमच्याकडे असायलाच हवी. तो राहतो कुठे, किंवा त्याची भेटण्याची ठिकाणं तुमच्या कॉलनीतील कोणाला तरी नक्की महिती असायलाच हवीत. तुमची इच्छा असो किंवा नसो पण तुमच्यातील कोणाचे तरी पाणीवाल्यासोबत चांगले संबंध असायलाच हवेत.
तुम्हाला वाटत असेल आता हे काय नवीनच, पण मराठवाड्यातील अनेक शहरातील ही स्थिती आहे. म्हणजे ज्या शहरांना नगरपालिका, महानगरपालिका पाणी पुरवठा करते. तिथली ही गोष्ट आहे. शहरांमध्ये विविध भागात पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या मोठ्ठाल्या टाक्या उभारल्या आहेत. म्हणजे लातूरमध्ये तर बार्शी रोडला पाण्याची टाकी नावाने ओळखला जाणार परिसरच आहे. त्या टाक्यातंर्गत विविध प्रभाग असतात. त्या भागात पाणी सोडण्यासाठी जे लोक असतात, ते नगरपालिका, महानगरपालिकांचे  कर्मचारी असतात. पण सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ते असतात पाणीवाले.
मराठवाड्यातील अनेक शहरांमध्ये कमीत कमी चार दिवसांनी पाणी येतं. मध्ये केव्हा तरी जास्त पाऊस झाला होता, त्यावर्षी मात्र एक दिवस आड पाणी यायचं. पण ते काही जास्त दिवस नाही. मध्ये मध्ये तर १५ दिवसाला पाणी यायचं. आता सध्या २० दिवसाला पाणी येतंय. काही शहरांना तर आता नगरपालिकेकडून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. नळ हे फक्त घरातील शोभेची वस्तू बनले आहेत.
जाऊद्या आताच्या लेखाचा तो विषय नाही, पुढच्या लेखात वगैरे लिहिन कधीतरी.
तर पाणीवाला हा जो व्यक्ती आहे, तो आवर्षणग्रस्त शहरांतील सर्वांसाठी जास्तच महत्त्वाचा. म्हणजे  पाणी कधी येणार आहे, कधी नाही. कोणत्या वारी पाणी येणार. किती वेळ पाणी असेल याच्यावर सर्व नियंत्रण या गड्याचं. नागरिकांच्या रोषाला आणि आभारालाही सामोरे जाणारा हाच. कधी त्याच्याबद्दल चांगलं तर कधी त्याच्याबद्दल वाईटही बोललं जाणार. पण सगळ्यांच्या जीवनात याचं स्थान थोडं फार तर असणारच. म्हणजे आता लातूरात पाणी येऊन १८ दिवस झाले. मग सगळे एकच म्हणतात, पाणीवाल्याला विचारून या की, कधी पाणी सोडणार आहे, मग दररोज वेगळी वेगळी माणसं जातात आणि त्याला विचारून येतात. मग तो ही सांगतोय, दोन दिवसांनी. पाणी नसल्यामुळे टप्प्याटप्याने पाणी सोडायला चालू आहे. तुमच्या भागाचा नंबर दोन दिवसांनी येईल. मग त्यांनं तिकडून तसं सांगितलं की, लोकं तळ गाठलेले घरातले सिंटेक्स, टाक्या, हौद साफसफाई करायला सुरूवात करतात. कारण पाणी आल्यानंतर ते पाणी पुढचे २० एक दिवस वापरायचं असतात (आता हे वाचून काहींना मळमळ व्हायला सुरूवात होईल, पण हे वास्तव आहे). त्यामुळे साठवायच्या वस्तूंची साफ सफाई केल्याशिवाय पर्याय नसतो.
तसं या सर्व भागांमध्ये पाणी येण्याची काही ठरलेली वेळ नसते. म्हणजे पूर्वी जेव्हा वार ठरवून दिलेले असायचे तेव्हाही काही ठराविक अशी वेळ नसायची. मग लोक दिवसभर वाट बघत बसणार. घरगुती कार्यक्रम, लग्न यांचे मुहूर्तही पाणी येण्याचा दिवस सोडून. म्हणजे मुहूर्त बघण्याची पद्धत एवढीच, ज्या दिवशी पाणी येणार आहे तो दिवस सोडून कधीही कार्यक्रम, लग्न करा. मग कधी सकाळी चारला, कधी रात्री १२ ला, कधी रात्री २ ला, कधी दुपारी अशी पाणी येण्याची वेळ. आता या सगळ्या मागं पण पाणीवाल्यांचं एक गणित असतं. एका भागाला पाणी सोडलं की, पुन्हा टाकी भरायला वेळ जातो. त्यात लाईट असली तर बरं, नाही तर सगळं बोंबललं म्हणून समजा... टाकी भरली की लगेच पाणी सोडायचं, त्याला वेळ काळ नावाचं काही बंधन नाही. रात्री पाणी सोडायचं असलं की हा पाणीवाला त्या त्या भागात जाणार, ओरडून ओरडून लोकांना उठविणार, पाणी सोडतोय सांगणार. मग जी लोकं उठली ती इतर न उठलेल्यांना उठविणार, आणि मग हा जाऊन पाण्याचा वॉल्व्ह सोडणार. तोपर्यंत लोक पाईप वगैरे लावून, मोटारी लावून तयार. मग रात्री २ वाजता पाणी भरायचं. पूर्वी सरासरी २ तास पाणी असायचं. घरातल्या स्त्रियाही कपडे – भांडे वगैरे सगळं तेव्हाच धुवायच्या, म्हणजे कसं नंतर साठविलेल्या पाण्यातलं पाणी उडणार नाही. मग काय तो पर्यंत सकाळच व्हायची. दुसऱ्या दिवशी पाणीवाल्याचं कौतूकच. सगळ्यांना उठविलं म्हणून.
कधी कधी टाकी पूर्ण भरलेली नसायची पण नियोजन लागावं म्हणून पाणी सोडलं जायचं. पाणी आलं म्हणून सगळेजण आधीचं शिळं पाणी झाडांना वगैरे टाकून देणार. सगळं रिकामं करणार आणि मध्येच जिथं पाण्याची टाकी आहे तिथली लाईट गेली की मग नळाचंही पाणी जाण्याच्या अनेक घटना सातत्याने घडायच्या. टाकी भरलेली नसल्यामुळे पाणीही बंद व्हायचं. म्हणजे हे जरा जास्तच विचित्र प्रकरण असायचं. अशा वेळी लोकांना जेवढा राग येत असेल ना तेवढी कधीच येणार नाही. मग पाणीवाल्याच्या खाणदाणाचा उद्धारच. सगळ्या महिलांचा मोर्चा वळायचा तो पाण्याच्या टाकीकडं. पाण्याची टाकी म्हणजे ह्या पाणीवाल्याचं दुसरं घर. तिथं जाऊन त्याला जाब विचारायचा या रागात सगळ्या निघायच्या. पण त्या पट्ट्यालाही माहिती असायचं की असं काही झालं की आपलं  काही खरं नाही म्हणून तो तिथून गायब व्हायचा. असं अचानक पाणी गेल्यानंतर त्याला भांडायला गेलेल्या लोकांना तो काही आजपर्यंत तिथं भेटला नाही. नंतर लाईट आल्यानंतर पाच -  सहा तासांनी टाकी भरली की पाणी तो पाणी सोडणार आणि मग फिरत फिरत त्या भागात चक्कर मारणार.अशा वेळी त्याची कारणंही ठरलेली. पण त्याचा व्हायचा तेवढा उद्धार झालेलाच असायचा.
कधी कधी रात्री १० वाजता वगैरे पाणी सुटलं की, ते १२ वाजता बंद होणं नागरिकांना अपेक्षित असायचं. पण १ वाजले २ वाजले ३ वाजले तरी पाणी काही बंद व्हायची शक्यता नाही जाणवलं की ठरलेल्या  मराठवाडी टोनमध्ये एक वाक्य सातत्याने तोंडातून निघणार, “मेला, कडूभाड्या पडला वाटतं पिऊन कुठंतरी.” पाण्याच्या बाबतीत जी मंडळी थोडी फार जागरूक असते ती पाणी भरून झाली की नळ बंद करून ठेवणार पण काहींची मात्र मज्जाच असणार गाड्या धुवा. घरं धुवा इथंपासून गटारी धुवायलाही मागं पुढं न पाहणारी माणसं तुम्हांला भेटतील. कुणाला वाटलं तर तो पाणीवाल्याला शोधायला जाणार,भेटला चुकून तर पाणी बंद करायला लावयचं नाही तर रात्रभर पाणी चालूच.
कधी कधी पाणीवाल्याची मात्र चांदी असायची, एखाद्या भागात कोणाचं लग्न असलं, किंवा कार्यक्रम असला की त्याला लोकं नियोजित तारखेपेक्षा आधीच पाणी सोडण्याची विनंती करायचे. अशावेळी काय त्याचं महत्त्व एकदम वाढलेलं वाटणार ? ज्याच्या घरी लग्न आहे त्या घरातला कर्ता पुरूष पाणीवाल्याला भेटायचा प्रयत्न करणार. पण तो काही त्यावेळी भेटायच्या मूडमध्ये नसणारच. घरी गेलं की तिथंही नसणारच. कारण डिमांड वाढलेली असते ना. थोडा फार भाव खाणार पण लोकांच्या विनंतीला ही पाणी सोडणारी मंडळी कधी नाही म्हणायची नाहीत. कारण त्यांनाही माहिती असायचं की लोकांसाठी पाणी काय गोष्ट आहे. त्यात घरी कार्यक्रम म्हटलं की, ‘लोकांना कार्यक्रम कसा होईल याची काळजी कमी आणि आलेल्या पाहुण्यांना पाणी कमी पडू नये याचीच काळजी जास्त’. पाणी सोडलं की, लोकंही आनंदानं त्याला काही पैसे आभार म्हणून देतात.
शाळेतून येणाऱ्या पोरांना पाण्याच्या पाईप लाईनच्या वॉल्व्ह जवळ पाणीवाला दिसला की ही पोरं जोरात सायकल मारत घरी जाणार, ‘पाणी सोडायलंय, पाणी सोडायलंय’ असं सगळ्यांना सांगणार. नळाला पाणी येणारा दिवस आजही रविवारपेक्षा मोठा असतो जिथं २० दिवसाला पाणी येतं तिथं.  म्हणजे कोणालाही पाणीवाला पाण्याचा व्हॉल्व्ह सोडताना दिसला की काहीही कितीही महत्त्वाचं काम असलं तरी पाणी येतंय हे सांगण्यासाठी घरी वापस जाणं ही जितकं त्याला महत्त्वाचं वाटतं तितकं दुसरं काही नाही.
सायकल, सायकलीला अडकवलेला वॉल्व्ह सोडायची (म्हणजे वॉल्व्ह लूज करायची) किल्ली , डोक्यावर टोपी. खाकी पोशाख. अशी पाणीवाल्याची ओळख आजही तशीच आहे. व्यक्ती बदलल्या असतील पण त्याची प्रतिमा तशीच आहे. पाणीवाला हा महापालिकेचा कर्मचारी असला तरी तो ठरलेल्या एकाच सामाजिक स्तरातून आलेला आहे असे जाणवले, कांबळे, गायकवाड, साठे, शेख इत्यादींनाच तिथं १०० टक्के आरक्षण . काही मोजक्या लोकांसाठी हा पाणीवाला थट्टेचा विषयही असतो. पण अशी थट्टा करणारी मंडळी खूप कमी असतील. अनेकांना मात्र दिसतो तो ‘त्यांच्यासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे डोक्यात ठेवून रात्री बेरात्री लोकांना अगोदर उठवून नंतर पाणी सोडणारा पाणीवाला’
कोणाच्याही रक्ताच्या नात्यातील नसतानाही, किंवा वैचारिक नातं नसतानाही, किंवा दररोजचं उठणं – बसणं नसतानाही पाणीवाल्याचं सगळ्यांसोबत एक नातं तयार झालेलं आहे. ते कदाचित फक्त दुष्काळ आणि पाणी यामुळंच.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

No comments:

Post a Comment