Saturday, September 19, 2015

नवे संविधान नेपाळसाठी स्थैर्याचा किरण ठरणार ?


रात्री बाराच्या ठोक्याला नेपाळमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. आठ वर्षाच्या वादानंतर आज नेपाळमध्ये परत एकदा संविधानाचे राज्य परतलेले असेल. विरोध, जाळपोळ, आंदोलने यातून करपून सुलाखून निघालेला नेपाळ या नव्या संविधानाच्या अंमलबजावणीने स्थिर होईल (?) अशी अपेक्षा करण्यास संविधानिक भारतातील एक नागरिक म्हणून काय हरकतही नाही. पण मुळत: संविधानाच्या मान्यतेपासून निर्माण झालेला वाद नेपाळला स्थिरावू देईल का?

आजपासून लागू झालेल्या नेपाळच्या संविधानाने नेपाळला संघराज्य आणि धर्मनिरपेक्ष राज्याचा दर्जा दिला आहे. नेपाळची विभागणी सात प्रांतामध्ये झालेली असेल. प्रतिनिधीमंडळातील सदस्यांची संख्या जनसंख्येवर नाही तर भौगोलिकतेवर आधारलेली असेल.
नेपाळमध्ये सध्या माओवाद्यांनी समर्थन दिलेले सरकार अस्तित्वात आहे. ८ वर्षापूर्वी सत्तेत आल्यावर नवीन संविधान निर्माण करण्याची घोषणा त्यांनी केली. पण दोन वर्षातच सत्तेतून त्यांना पायउतार व्हावे लागले. त्या माओवादी आणि प्रस्थापित पक्ष यांच्यात युती होऊन नवीन सरकार अस्तित्वात आहे. पहिल्यांदा स्थापन केलेली संविधान सभा विसर्जितही करण्यात आली. सध्याचे संविधान हे दुसऱ्यांदा स्थापन केलेल्या सभेने तयार केले आहे. म्हणजेच नव्या संविधानाचा संपूर्ण प्रवास हा अस्थैर्याचाच आहे.
१४ सप्टेंबरला संविधान सभेने नव्या संविधानाचा स्विकार केला, पण त्याचवेळी संपूर्ण नेपाळमध्ये या संविधानाच्या विरोधासाठी आंदोलने मोर्चे चालू होते.
हा विरोध मुख्यत: तीन मुद्दयांभोवती फिरत आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये मुख्यत: महिला, दलित आणि कट्टर हिंदुत्ववाद्यांचा समावेश आहे. पण या तिनही समूहगटांच्या विरोधाची कारणे भिन्न आहेत.
सध्या सत्तेत असणारे माओवादी व इतर पक्षांचे नेतृत्व हे उच्चवर्णियांच्या हाती आहे. त्या निर्णय प्रक्रियेत दलित समाजगटाचे प्रमाण अत्यल्प असल्याचा आरोप स्थानिक दलित संघटना करीत आहेत. संविधानामध्ये त्यांचे प्रतिबिंब पडल्यामुळे दलित व इतर मागास गटांसाठी असलेल्या कोट्याचे प्रमाण हे कमी करण्यात आल्याचा मुख्य आक्षेप या दलित संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे व इतर काही तरतुदीमुळे दलितांच्या शोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
महिलांना दुय्यम स्थान देणाऱ्या नव्या संविधानातील काही तरतुदींमुळे महिलांनीही बंड पुकारले आहे. एकीकडे महिलांना समानतेची वागणूक देण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात असताना नेपाळच्या संविधानातील काही तरतुदी या आश्चर्यकारक आहेत. त्यातील एका तरतुदीनुसार नेपाळच्या महिलेने परदेशी व्यक्तीशी विवाह केल्यानंतर त्यांना होणाऱ्या मुलाला नेपाळचे नागरिकत्व मिळण्यासाठी पहिल्यांदा तिच्या पतीने नेपाळच्या राष्ट्रीयत्वाचा स्विकार करणे बंधनकारक केले आहे. हा मुद्दा देशाच्या नागरिकत्वाशी संबंधित असल्यामुळे महिलांचा याला आक्षेप नाही. पण नेपाळी पुरूषाने परदेशी महिलेशी विवाह केल्यानंतर त्यांच्या मुलाला मिळणाऱ्या नेपाळच्या नागरिकात्वासाठी काहीही अट ठेवण्यात आली नाहीये. मग महिलांसोबतच ही असमानता आणि बंधनं का ? यासाठी या महिलांना संविधानातील महिलाविरोधी तरतुदींविरोधात बंड पुकारले आहे.
नेपाळने या नव्या संविधानच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षतेचे धोरण अवलंबिले आहे. याला देशातील कट्टर हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाने विरोध दर्शविला आहे. त्यांच्या मागणीनुसार नेपाळची हिंदु राष्ट्राची ओळख पुनर्पस्थापित करून द्यायला हवी होती. त्यासाठी त्यांनी जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्याचाही मार्ग स्विकारलाच. धर्माच्या नावाखाली जगभर वाढणारी हिंसा लक्षात घेता संविधानसभेच्या धर्मनिरपेक्षतेचे तत्व अवलंबविण्याच्या निर्णयाचे अभिनंदन आणि कौतुक करणे गरजेचे आहे. पण संविधानातील सनातन धर्माची सुरक्षा करणे हे राज्यसंस्थेचो आद्य कर्तव्य मानण्यात आले आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.
दलित, महिला आणि हिंदू यांचा संविधानातीव तरतुदींना असणारा विरोध, आतापर्यंत आंदोलनात गेलेले ४५ बळी नेपाळसाठी स्थैर्याची नवी पहाट निर्माण होऊ देतील का हा मला सर्वांत महत्त्वाचा प्रश्न वाटतो.
माओवाद्यांनी नवे संविधान त्यांच्या शहीदांना समर्पित केले आहे. त्या शहीदांचे स्वप्न आज पूर्ण झाल्याची त्यांची भावना आहे.
तर दुसरीकडे नेपाळच्या संविधानाने अतिशय लिबरल भूमिका घेत एलजीबीटी समुदायाच्या हक्कांचे संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य असल्याची तरतूद केली आहे. अशी तरतूद असणारे नेपाळ हे अशियातील पहिले व दक्षिण अफ्रिका आणि इक्वॉडोरनंतरचे जगातील ३ राष्ट्र ठरले आहे.
नेपाळचे हे नवे संविधान आता तिथल्या नागरिकांसाठी स्थैर्याचे नवे किरण बनू शकेल काय याचे उत्तर मात्र येणारा काळच देईल. पण सध्या तरी नेपाळच्या स्थैर्यासाठी या संविधानाला शुभेच्छा.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Tuesday, September 15, 2015

जैविक शेती काळाची गरज,

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Thursday, May 21, 2015

दुष्काळही मला एफ. सी. रोडवर भेटला

मे महिना नुकताच सुरू झालेला, परिक्षा चालू होत्या. दिवसभर वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या भूमिका असणाऱ्या लोकांची तीन व्याख्याने एेकण्याची संधी आज परत एकदा मिळाली होती. पुण्यप्रसन वाजपेयी, अजित अभ्यंकर, विनय सहस्त्रबुद्धे...

रात्रीचे ११ वाजलेले, रविवारच्या दिवशी लाखो पाऊले आपल्या अंगावर घेतलेला एफ.सी रोड शांत झाला होता. मोजके हॉटेल चालू होते. काही बंद होण्याची तयारी करत होते. दिवसभर लोकांसमोर भीक मागणारे हात आता फूटपाथवर शांत पडलेले होते. 

रविवारी मेस बंद , त्यातच महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे खिशात थोडे फार पैसे असल्याने कुमठेकर रस्त्यावरचा मिलन खानावळीमध्ये कोल्हापूरी रस्स्यासोबत जेवणाचा बेत उशीरा का होईना यशस्वी झाला होता. कुमठेकर रोड, झेड ब्रिज, डेक्कन बस स्टॉप, गुडलक करत पायं रूम कडं चालत होती. सोबत मित्र अजय होता. सतत अबोल असणारा अजय आज जेवताना भरभरून बोलला होता. त्याच्या कामाबद्दल, लोकं करत असलेल्या अवास्तव अवाढ्व्य खर्चाबद्दल तो खुलून बोलला होता. त्या आनंदात रूम कडं चाललो होतो. गुडलक चौकात भांडारकर रोडच्या सुरूवातील पोलिसांकडून गाड्यांची तपासणी चालू होती. 

डेक्कन कडून प्रयाग हॉस्पिटल समोरून आल्यावर गुडलक चौकातून उजवीकडं वळालं की लगेच सोनवणेंचा बुक स्टॉल लागतो. नुकताच दहा वर्षानंतर सीपीएम च्या केंद्रिय स्तरावर बदल होवून सीताराम येचूरी नवे सचिव बनले. त्यावर आधारित तहेलका या मासिकाचा अंक बाजारात आला होता. पण तरूण तेजपाल प्रकरणानंतर पुण्याच्या मोजक्याच स्टॉलवर अंक उपलब्ध असतो, त्यामुळे मिळायची मारामार असते. रात्री ११ वाजता चालू असलेल्या सोनवणे च्या स्टॉलवर चालत चालत चौकशी केली अंक आहे का? अंक होता. तहेलका चा अंक वाचणं म्हणजे एक सर्वांपेक्षा नवीन आशय वाचायला मिळणार याची खात्री...रूमवर जायची वाट कशाला पहायची म्हणून अंक चाळत चाळतच हॉर्न ओके प्लीज समोरून रस्ता क्रॉस करून आर्यभूषण प्रेस कोपऱ्यावरच्या गोखलेंच्या पुतळ्यापासून रानडे इन्स्टिटयुट कडं फूटपाथ वरून चालायला सुरूवात केली. अंक चाळता चाळता सीताराम येचूरी यांच्या विषयी अजय सोबत चर्चा चालू होती. आर्यभूषण च्या कोपऱ्यावरील वडापाव वाला आता गाडा आवरायच्या तयारीत होता. अजय रस्त्याच्या बाजूने आणि मी आर्यभूषण प्रेसच्या कंपाऊंडच्या बाजूनं चालत निघालो होतो. रानडे इन्स्टिटयुटसमोरच्या पीएमपीएमएल च्या बसस्टॉपवर तुरळक गर्दी होती. बसस्टॉप सुरू व्हायच्या कोपऱ्यावर एक १२ १३ वर्षाचा पोरगा, चेहरा काळा पडलेला, कपाळावर टिळा लावला होता, रस्त्याकडं तोंड करून बसलेली, आम्हांला पाठ करून बसलेली बँग घेऊन बसलेली बाई कदाचित त्याची आई असावी, तिच्या मांडीवर एक लहान लेकरू दिसत होतं.

अजय रस्त्याच्या बाजूनं चालत असल्यामुळे त्या पोरानं अजयला थांबवलं आणि अजयला म्हणाला "भाऊ, एक मिनिट".
आता माझं कॉलेज एफ सी रोड वर असल्याने याची दररोज सवय झालेली. एफ. सी रोड असे कित्येक लोक लहान पोरं अश्या परिस्थित वावरत असतात. पण एवढ्या उशीरा हा पोरगा विचारतोय म्हणंटल्यावर थोडं पुढं गेलेला मी वापस आलो. विचारलं "काय". पोरगा म्हणाला "दुसऱ्या गावावरून आलोय, पैसे नाहीत, दहा रूपयं द्या भाऊ". मी मराठवाड्यातला असल्यानं त्या पोराच्या भाषेचा टोन मराठवाडी वाटला. आत्ताच जेवण झालेलं, त्यात तो तहेलका चा अंक घेतलेला त्यामुळं खिशात जेमतेम पैसा उरलेला. आता तो पोरगा खरं बोलतोय का? याचा विचारही मनात आला नाही आणि हात आपोआप खिश्याकडं गेला. काढून १० रूपये दिले त्या पोराला. पैसे देताना नजर त्याच्या आईकडं गेली आणि दहा रूपयात तिघांचं काय होणार हा विचार मनात येऊनच गेला. मग त्या पोराला म्हंटलं चल इथं कोपऱ्यावर वडापाव मिळतो घेऊन देतो. बसस्टॉप ते आर्यभूषण कोपऱ्यावरचा वडेवाला यांच्यातलं अंतर १० सेकंदाचं. त्याची आई ओरडत होती तिकडं कुठं जातोस इकडं स्टेशनकडं जायचंय आपल्याला. पोरानं माईला सांगितलं वडापाव आणतो म्हणून..मग त्याला विचारलं कोणत्या गावचा, इकडं कसं काय?
पोरगा म्हणाला "परभणी" मला त्या भागात फिरल्यामुळं थोडीफार माहिती. म्हणून विचारलं परभणीचा कुठला. त्यानं लगेच उत्तर दिलं गावाचं नाव सांगितलं आणि म्हंटला जिंतूर जवळ गाव हाय. इकडं कसं काय विचारलं तर म्हणाला " आमच्याइकडं दुष्काळ पडलाय, काम नाही काही म्हणून काम बघायला आलोय इकडं"
मी ही मराठवाड्यातला. मराठवाडा आणि दुष्काळ यांचं जिव्हाळ्याचं नातं. आम्हीही लहानपणी उन्हाळ्यात सोसायटीतल्या पाण्याच्या टाकीवर पाण्यासाठी रांगा लावून बसायचो. मागील पाच सहा वर्षापासून लातूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटलाय. त्यामुळं दुष्काळाची तीव्रता काही जाणवत नाही. ८ १५ दिवसाला पाणी येतंय. मग घरातले लहान मोठ्या भांड्यासह २ ३ बँरेल हौद आम्ही आजही भरून ठेवतो. मागील चार वर्षापासून पुण्यात आहे. त्यामुळं दुष्काळ या शब्दाचा संबंध फक्त पेपर वाचताना आणि रानडेच्या कँन्टीनमधल्या चर्चांमध्येच यायचा. मागच्या डिसेंबरमध्ये गावाकडं गेलतो तेव्हा ओसाड पडलेली शेतं पाहून बाप म्हणाला होता यावर्षी अवघड आहे लय. ऑक्टोंबर पासून एवढं अवघड असून सुद्धा, लातूरला गेल्यावर पेपरमध्ये वाचलेल्या आत्महत्या वाचूनसुद्धा माध्यमांना आणि मलाही दुष्काळ जाणवतच नव्हता. कारण पुण्यात कसला आलाय दुष्काळ, पेपरमध्ये कुठंतरी कोपऱ्यात आलेल्या दुष्काळाच्या आणि आत्महत्येच्या बातम्या तीव्रता कमी करत होत्या. सगळं कसं आलबेल चाललंय हे दाखविणं चाललं होतं. दुष्काळासंबंधीच्या माहितीचाच माध्यमात दुष्काळ पडलाय असं वातावरण सगळं आजूबाजूला...

आणि आज हा दुष्काळ एका आक्राळ विक्राळ स्वरूपात मला माझं खरं रूप जागा दाखविण्यासाठी एफ सी रोडवर भेटला होता. दुष्काळ म्हंटलं की स्थलांतर आलंच. १९७३ ७४ पासूनच्या दुष्काळानंतर मराठवाड्यातून स्थलांतराचं प्रमाण वाढलेलं. हे स्थळांतर पुण्याकडं अधिक. पिंपरी चिंचवड, भोसरी काळेवाडी कात्रज हडपसर भागात बहुतांश मराठवाड्यातलीच लोकं. दुष्काळात आलेले. आजही मराठवाड्याचं भीषण वास्तव आपल्याला माहित नसलं तरी पुण्यात येणारे लोक थोडंच थांबणार आहेत. विकासाचं केंद्रिकरण झालं की लोकसंख्याही तिकडं केंद्रित व्हायला चालू होते. असो.

बोलता बोलता वडापावच्या गाड्यावर आलो. वडापाव वाला ओळखीचा. साहेब पाव नाहीत सांगू लागला. मग म्हणाला फक्त वडा देवू का? वडा घेऊन परत वापस फिरलो, त्या पोराला विचारलं शिक्षण किती झालं. त्यानं उत्तर दिलं चौथी.
आता काय काम करणार विचारल्यावर म्हणाला बघू जिथं भेटंल तिथं करीन. सलग दोन दिवसाचं काम भेटलं तर रूम करीन, आत्ता मात्र झोपायला स्टेशन वर.
त्याचं बोलणं ऐकून आवसान निघून गेलेलं. कसं जगत असतील हो ही माणसं. दुष्काळावर दुष्काळग्रस्त भागात न राहता बोलणाऱ्या आपण सर्वांना खरंच जगण्याची अस्तित्वाची ही धडपड आपल्या माध्यमात लिखाणात साहित्यात तेवढ्याच प्रखरपणे मांडता येईल का?
शेवटी न रहावून विचारलं बाप कुठं हाय. म्हणाला गावाकडं तो नाही आला इकडं.
एवढं बोलेपर्यंत बसस्टॉप आलता. मग तो फूटपाथवरून उतरून रस्त्यावर बसलेल्या आईकडं गेला. मी आणि अजय मात्र हादरल्यासारखं पुढं निघालो. कदाचित हे हादरणं फक्त सुरूवात होती काही मनातले बुरूज शिल्लक असतील म्हणून की काय पुढं अजून घडायचं बाकी होतं.
रानडेच्या गेटसमोर पोहचतो न पोहचतो तर तोच पोरगा त्याची माय आवाज देत आले. तोंडावर गोंदल्याच्या खूणा स्पष्ट दिसत होत्या गळ्यात फक्त काळा दोरा दिसत होता. पोराच्या खांद्यावर बँग होती. बँगचे खालचे दोन्ही कोपरे फाटलेले त्यातून आतले कपडे बाहेर लोंबत होते.
बाई म्हणाली "इथं जवळ दवाखाना हाय का, कमरेवरच्या लेकराकडं पाहत म्हणाली. पोराला लय ताप आलीय." तिच्या त्या बोलण्याने काहीच कळेनासं झालं. एक तर रात्रीचे ११ वाजलेले त्यात एफ. सी रोड वर एखादा दवाखाना आठवण्याची क्षमताच राहिली नव्हती. त्यात त्यांच्याकडं खायला पैसे नव्हते मग दवाखान्याचं कसं...मनात अनेक प्रश्न अस्वस्थता निर्माण झाली होती. अजयही शांतच होता पण त्याच्याही मनातली अस्वस्थता काही लपत नव्हती. थोड्याच वेळापूर्वी जेवताना तो बोलत होता, वाढदिवसांच्या इव्हेंटमध्ये होणारी उधळपट्टी पाहवत नाही...
कदाचित त्या बाईला हे सगळं मनातलं जाणवलं असावं. ती म्हणाली,"दवाखाना सांगा, डॉक्टर ला बोलते मी जे बोलायचय ते".
माझ्या तोंडातूनही लगेच प्रयाग हॉस्पीटलचं नाव निघालं. त्यांना पत्ता सांगितला. थोडे फार पैसे द्यावे म्हंटलं तरी खिशात पैसा नव्हता. रानडे इन्स्टिटयुटपासून रस्ता क्रॉस करत वाडेश्वर कडून प्रयाग हॉस्पीटलकडं दिशेने ते तिघं निघाले होते. कंबरेवरचं ते पोर डोळ्यात डोळे टाकून माझ्याकडं दूरवर जाईपर्यंत पाहत होतं. त्याचे ते माझ्याकडचं पाहणं आज २० दिवसानंतरही जसच्या तसं आठवतंय मला...
विकास असाच जर एफ सी रोड भोवतीच केद्रिंत होणार असेल तर कदाचित कधी ना कधी दुष्काळाच्या झळाही आम्हांला याच एफ सी रोड वरच जाणवल्याशिवाय राहणार नाहीत.. दिवसभरात तीन व्याख्यानामध्ये दुष्काळ कुठंच जाणवला नाही. दिवसभर तीन व्याख्यानं परत आवडतं मासिक भेटलं यातच समाधान मानून झोपण्याच्या आरामाच्या तयारीत असताना आपली झोप उडावी असा अनुभव यायलाच हवा...कदाचित आपल्या व्यवस्थेचं पण हेच झालंय...मुख्य समस्या कुठंच जाणवत नाहीयेत. आणि ज्या समस्याच नाहीयेत त्याच समस्या समजून आपण प्रयत्न करत असतो आणि त्याचाच आनंद साजरा करण्याच्या तयारीत असतानाच हादरा देतं कोणी तरी....मग येते अचानक एकदम खडबडून जाग....

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Tuesday, February 17, 2015

परत एक दहशतवादी हल्ला

       काल रात्रीच "पेन हत्यारापेक्षा कशी ताकदवान असते" या संबंधीचा एक निबंध वाचत होतो. आणि आज सकाळी दहाच्या सुमारास फोन मेसेजेस् येऊ लागले, कोल्हापूरमध्ये कम्युनिस्ट नेते विचारवंत लेखक कॉ.गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी कॉ.उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाला आहे. दोघांनाही गोळ्या लागल्यात आणि परिस्थिती गंभीर आहे याची जाणीव व्हायला वेळ लागला नाही.
       तेवढ्यात लहानपण आठवायला सुरूवात झाली. घरात पुस्तकाच्या कपाटात खूप सारी पुस्तकं होती आजही त्यात भरच पडत आहे. मग त्या सगळ्यातून एक पुस्तक लक्ष वेधून घ्यायचं, पांढरं कव्हर त्यावर जाडजूड अक्षरात लिहिलेलं नाव आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. मोठ्या मोठ्या पुस्तकांपेक्षा हे ५० ६० पानांचं पुस्तक हातात घ्यायला वाचायला बरं वाटायचं. समजत काही नव्हतं पण वाचायचं तसंच. ते पुस्तक होतं गोविंद पानसरे याचं "शिवाजी कोण होता?". पहिली ते चौथी पर्यंतच्या राज्य शासनाच्या पुस्तकातून भवानी मातेने तलवार दिलेल्या शिवाजीची  ओळख तर झाली होती पण "जाणता राजा" शिवाजीची ओळख पानसरेंनी राज्यातल्या माझ्यासारख्या लाखोंना करून दिली असेल.
         पण आज दाभोळकरांपाठोपाठ दाभोळकरांच्या हत्येसारखाच पानसरेंना संपविण्याचा कट रचण्यात आला. त्यामधल्या काळात पुण्यात सीपीएमच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात आला होता. महाराष्ट्रातील हल्ल्यांची ही मालिका संपायचं काही चिन्ह आज तरी दिसत नाहीये. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद्यांनी कट्टरधर्मींयांनी थैमान घातले आहे. मग त्यात पेशावर, चार्ली हेब्डो सारखी ताजी उदाहरणं आहेतच. त्याचा निषेध करण्यासाठी आमच्या हिंदूस्थानवासीयांचा उत्साह शिगेला गेला होता. जसं मुताऱ्यांच्या भिंतीवर कागदं चिकटावून घाण भिंती तयार होतात तश्या आमच्या फेसबुक वॉल निषेधानं भरल्या होत्या, का ? तर मुस्लीम ना?.तसं पाहिला तर गांधी, दाभोळकर, पानसरे यांच्यावर हल्ला करणारे मुस्लिम नव्हते ना म्हणून आमच्या साठी हे हल्ले दहशतवादी वाटतच नाहीत. तर दुसरीकडं आमच्या या देशात सामाजिक कार्यकर्त्यांचे, विवेकवादी विचारवंतांचे समाजातील दलित शोषितांचे सातत्याने खून होत होते. काही खून समोर आले तर काही तसेच पचवले गेले. त्यामुळे धर्माच्या नावावर चालू असलेल्या या हत्यांचे काय? ज्याप्रमाणे २६/११ चा दहशतवादी हल्ला देशासाठी घातक होता तेवढेच घातक दाभोळकर पानसरे यांच्यावरचे हल्ले. बाहेरच्या जगात जे चालू आहे ते दहशतवादी आणि आमचं म्हणजे राष्ट्रवादी ? असं कसं चालेल ना.
         आज पानसरेंवर झालेला हल्ला देखील परकिय राष्ट्रविघातक शक्तींनी केलेल्या हल्ल्या एवढाच तीव्र दहशतवादी हल्ला होता. फरक एवढाच बाहेरचे एका विशिष्ट धर्माचे आहेत तर आतले देखील एका विशिष्ट धर्माचेच आहेत. फरक आहे तो फक्त धर्माच्या नावाचा. विशिष्ट राष्ट्रनिर्मितीच्या रस्त्यात ज्यांनी कम्युनिस्टांना नंबर एकचा शत्रू मानलं आहे तेव्हा पूर्ण राजकीय शक्ती हातात आल्यानंतर स्वप्न पूर्ण करायचे प्रयत्न तर होतीलच ना. त्यामुळे भविष्यात असे अनेक दहशतवादी हल्ले पहावयास मिळतीलच. पण एक गोष्ट नक्की आहे, ८२ वर्षाच्या वृद्धास गोळ्या घालण्याची गरज जेव्हा जाणवत असेल तेव्हा त्या गोविंद पानसरेंच्या विचारांची लेखनाची ताकद लक्षात येते. आजही या देशातील डावे लोक एक सक्षम वैचारिक पर्याय म्हणून जातीयवादी धर्मांध व भांडवली शक्तीपुढे उभे आहेत. कोणी कितीही ओरडलं की डावे संपले आहेत तरी सर्व सत्ताकेंद्रे हाती असताना असे भ्याड हल्ले करून समतावादी मानवकेंद्री विचार मांडणारे लोक आजही लढा देत आहेत आणि ते विचार आपल्याला काही सहजासहजी अराजकता माजवू देणार नाहीत म्हणून हे दहशत पसरविण्यासाठी दहशतवादी हल्ले चालू आहेत. या अशा हल्ल्यांमध्ये फक्त हल्लेखोरच नाही तर इथल्या लोकशाही धर्मनिरपेक्ष विचारांना मारक असणाऱ्या प्रवृत्तींना निवडून देणाऱ्या आपल्या सगळ्यांचेच हात दाभोळकर पानसरे यांच्या रक्ताने बरबटलेले आहेत, आपण सगळेच दहशतवादी आहोत. पण मानवी कल्याणाचा लढा हा सातत्याने चालणारा खंडित न होणारा लढा आहे. त्यासाठी अनेकांचा जीव गेलेला आहे हत्या झालेल्याच आहेत होतीलही पण विचार आजही जिवंत आहेत मग ते विचार क्षत्रियासारखेच असावेत कारण ते संपविण्यासाठी परशूराम नावाच्या गृहस्थाला २१ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करावी लागली होती म्हण त्यामुळे आमचे हे विचार संपविण्यासाठी गोडसेंची फौज देखील कामाला लावली तरी विचार काही समूळ नष्ट होणार नाहीत. त्या विचारांचे अंकूर उगविल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही धर्मनिरपेक्ष नसलेलं सरकार सत्तेत असलं तरी पानसरे व चुकून मोकून सापडले तर दाभोळकरांच्या हल्लेखोरांना देखील ते लवकरात लवकर पकडतील व शिक्षा देतील व  बाह्य दहशतवादावर बोंबा मारणाऱ्या तथाकथित राष्ट्रप्रेमींसमोर अंतर्गत दहशतवादाचा खरा चेहरा उघडा करतील, संस्कृतीच्या नावाखाली जीव घेणाऱ्यांचा बुरखा फाडतील अशी अपेक्षा करण्यात चूक नाही. शेवटी विवेकाचा आवाज बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही.
       लोकशाही धर्मनिरपेक्षता जिंदाबाद!

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Thursday, January 1, 2015

आमचं म्हणजे सार्वभौमत्व, आणि दुसऱ्यांचं?

नुकतेच सलमान खान हे भारतीय 'देशभक्त' श्रीलंकेत महिंद्र राजपक्से यांच्या प्रचारासाठी सभा घेत फिरत आहेत. सध्या भारतातील एकंदरीत परिस्थितीत निवडणूकांमध्ये सभा घेणे हे एक करियरच झाले आहे. त्यात आमचे पंतप्रधान मा. मोदी यांनी २०१४ मध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. मागील काही निवडणूकांमध्ये सिनेसृष्टीतील नट नट्यांनी राजकीय नेत्यांसाठी प्रचार सभा घेणे हे पैसे कमविण्याचे उत्तम साधनच बनले होते. निवडणूक काळात आम्हां भारतीयांना विचार न करण्याचा अनुवंशिक रोगच जडतो. मग आम्ही अगदी उदार मनाने या नट नट्यांच्या सभांना प्रचंड गर्दीने उपस्थित राहण्याच्या स्पर्धेत उतरत असतो आणि गर्दीही करतो. पण २०१४ या निवडणूकांच्या वर्षात मोदींमुळे किंवा मोदींनीच या कलाकारांच्या अभिनयाची दखल न घेता त्यांच्या पोटावर पाय ठेवला. कदाचित त्यामुळेच सातत्याने 'रक्षणाय' अशी पोलिसांची भूमिका साकारून देशभक्त असल्याचा भ्रम निर्माण करणाऱ्या सल्लूभाईंना  पोटापाण्यासाठी किंवा राजपक्षे किंवा मैत्रींन जँकलीन फर्नांडीस हिच्या मैत्रीसाठी श्रीलंकेचीच वाट धरावी लागली.
           भारतातील निवडणूकांमध्ये जर दुसऱ्या देशातील असे भुक्कड लोक प्रचारासाठी उतरले असते तर आमच्या 'राष्ट्र' संकल्पने भोवती पिळवटलेल्या आस्मिता जाग्या झाल्या असत्या. तेव्हा आम्हांला सार्वभौमत्वाची जाणिव राजकीय फायद्यासाठी का होईना झाली असती. कारण आम्ही ठरवलेलंच आहे ना की आमच्यामध्ये हस्तक्षेप केला की तो सार्वभौमत्वाला धोका आणि आम्ही दुसऱ्यांमध्ये केला की ते भारतीयांचे वैश्विकीकरण.  पण श्रीलंकेमध्ये जाऊन सलमान खान नावाचा श्रीलंकेचे नागरिकत्व नसलेला भारतीय गृहस्थ स्थानिक कलाकारांचा विरोध असताना प्रचारामध्ये सहभागी होत असेल तर अस्मितेच्या बोंबा मारणाऱ्यांना भूमिका घ्यावीच लागेल. जशी भारतीय असल्याची अस्मिता आहे तशी श्रीलंकेतील लोकांना श्रीलंकन अस्मिता नसणार का? निवडणूका हा एकंदरित पूर्णपणे श्रीलंकन लोकांचा महत्त्वाचा अधिकार आहे. जो व्यक्ती तिथला नागरिक नाही त्याने तिथं जाऊन लोकांना भ्रमित करणं हे लोकशाही मुल्यांच्या व राष्ट्रीय मुल्यांच्या विरोधी आहे. लोकशाही वर विश्वास ठेवणाऱ्यांनी व सार्वभौमत्वाचा आदर असणाऱ्यां सर्वांकडून याबद्दल प्रतिक्रियेची अपेक्षा होती कारण लोकशाही मुल्य ही फक्त भारतापुरतीच मर्यादित नसतात तर त्यांचे वैश्विकीकरण गरजेचे आहे. पण याबद्दलच्या प्रतिक्रिया कोठेच उमटल्या नाहीत. फेसबुक आणि व्हॉट्सअँप वर रंगलेल्या आमच्या समवयस्क तरूणांकडून अपेक्षा होत्या पण डिजीटल सिम्बॉल मध्ये संवाद साधणाऱ्यांना स्वताच्या देशाबद्दल जाणिवा नाहीत त्यांच्याकडून दुसऱ्या देशाच्या राष्ट्रीय मुल्य जपण्याची व त्यावर भाष्य करण्याची अपेक्षा करणे फसवीच वाटते.
त्यामुळे  भारतातून सुद्धा सलमान खानच्या एकंदरित या अर्थिक कार्यक्रमाला विरोध करणे गरजेचे आहे. सार्वभौमत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांची जर आज काहीच भूमिका नसेल तर निवडणूकांमध्ये  चीन व रशिया कश्याप्रकारे भारतातील कम्युनिस्टांना मदत करते किंवा अमेरिका कशी इथल्या  भाजपला व कॉग्रेसला मदत करते या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही. दुसऱ्यांच्या अस्मितांचा आदर केला किंवा ती दुखावणाऱ्याला विरोध केला तरच  आमची अस्मिता आमचं सार्वभौमत्व टिकून राहिल. वाच्यता न करणं वा विरोधी प्रतिक्रिया न देणं याचाच अर्थ समर्थन दर्शविणे असाही घेता येऊ शकतो. अन्यथा उद्या भारतातील निवडणूकांमध्ये परदेशी कलावंत सहभागी झाल्यास विरोध करण्याचे कारण नाही.

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Wednesday, December 17, 2014

परंपरांची खांदेकरी तिनंच का व्हायचं?

शिकणारी लेकरं  घरात असताना घरातील व्यक्ती अचानक मृत पावली तर काय? घरात शिकणारी मुलं आहेत, त्यांच्या शिक्षणाचा विचार समाज व तथाकथित नातेवाईक करतीलच, असे ही नाही. परत त्यात मुलगी असेल तर वेगळंच....नक्की काय असतात हो या परंपरा, मला तर समजल्याच नाहीत. घरातील व्यक्ती मेली तर घरातील मुलांची लग्नं एका वर्षातच करायचे नाहीतर  तीन वर्षानींच करायची. अशी एक भोंगळ परंपरा आमच्या आजूबाजूला आहे. समजा एक वर्षानंतर आणि तीन वर्षापूर्वी लग्न झालंच तर काय होणार? याचं उत्तर सुध्दा कोणी द्यायला तयार नाही. असाच एक अनुभव.
ओळखीतले एक काका वारले. त्यांच्या मागे दोन मुलं एक मुलगी पत्नी असा परिवार. तसं त्यांचं जाण्याचं वयही नव्हतंच. घरची परिस्थिती तसी चांगली.   मोठा मुलगा नुकताच नौकरीला लागलेला. दुसरा चांगल्या प्रकारे शिक्षण घेतोय. सगळ्यात लहान मुलगी..ती सुद्धा शिक्षण घेतेय. वडिलांचं निधन होवून दोन तीन महिने होतात तेच पाहुणे नामक समाज सेवकांनी ( कारण त्या कुटूबांची काळजी यांनाच आहे, असं भासविण्याकडे पाहुण्यांचा कल असतो ) एक वर्ष आणि तीन वर्ष वाली परंपरा या घरच्यांना सांगण्यास सुरूवात केली. लग्नाची दलाली करणाऱ्या नातेवाईकांची संख्या तर कोणाकडेच कमी नसते. लग्नाचा विषय निघाला की काहीजनांकडे विविध पर्यायसह विविध प्रकारची स्थळं उपलब्ध असतात. मुलांनीही कधी समाजात डोकावण्याची हिंम्मत दाखवली नव्हती. त्यामुळे नातेवाईक म्हणतील ती पूर्व दिशा समजून तिघांपैकी एकाचं लग्न लावायचा निर्णय एकमतानं झाला असावा. निर्णय तर झाला पण लग्न  करायचं कोणाचं हे कोणालाच कळेना. मोठ्याला नुकतीच नौकरी लागली होती, त्याचं लग्न लावायला कदाचित कसलीही अडचण नसावी, पण घराची जबाबदारी आपल्यावर आहे हे पटवून देण्यात तो यशस्वी झाला असावा. दुसरा शिक्षण घेत असल्यामुळे तो स्पर्धेतच नसावा कदाचित. राहिली ती मुलगी...तिची इच्छा वगैरे पहायला तो बाप देखील आता नव्हता. समाजानं मांडलेल्या या परंपरांच्या बाजारात जायचा तो तिचाच बळी दिला जावा हे आपोआपच निश्चित होणार होतं. झालंही तसंच. तिच्या लग्नाचा निर्णय झाला. वडीलधारे आणि त्यांच्यात आपले मत मांडायची कदाचित धमक वडिलांनीच तयार होवू दिली नसेल. तीन महिन्यापूर्वी वडील वारलेत. अर्धवट शिक्षण सोडून, शिक्षण पूर्ण करून करियर घडवायची स्वप्न तिनं गुमान मोडलीच असणार. पण तिनंच का मोडायचं सगळं, सगळं तिनंच का सोडायचं अर्धवट.  घुसमट जाणवली नसेल का तिच्या भावनांची कुणाला? कोणत्या परिस्थितीमध्ये आकार द्यायचं तिनं घराला. कसं पचवायचं दु:ख वडिलांच्या एकाएकी जाण्याचं, कसं पचवायचं दु:ख शिक्सन अर्ध्यावरी सोडल्याचं. पण शेवटी हे कोणासाठी चाली रिती रूढी मानल्याचं सुख सगळ्यांना भेटेलच फक्त तिचा एकटीचाच बळी दिल्यामुळे....काय झालं असतं हो कोणाचंच लग्न झालं नसतं तर...वडिलांना वाईट वाटलं असतं? काय झालं असतं भावांनी लग्न केलं असतं तर? काय झालं असतं एखाद्या नातेवाईकाने विरोध केला असता व समर्थन केले असते शिक्सन चालू ठेवण्याचे. असी अनेक पकरणे तुमच्या माझ्या आजूबाजूला घडत असतात आणि माझ्यासारखे तुम्हीही त्याचे मुक साक्षीदार बनत असता.........

लेखकाचे इतर वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/

Saturday, August 16, 2014

प्रतिकूलतेवर मात : विश्वंभर भोसले


2010 मध्ये लातूरच्या ‘मुक्तरंग प्रकाशना’ने छापलेल्या ‘प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातील माझे वडील विश्वंभर भोसले यांच्यावरील लेख .....................




शेती चांगली असल्याने अर्थिक परिस्थिती बरी म्हणण्याजोगी होती. कुटूंबावर धर्मिकतेचा प्रचंड पगडा होता. शिक्षणाचे महत्त्व माहित नव्हते, अशाही वातावरणात तो शिकला. बालपणापासून अस्पृशतेचे दाहक चटके त्याने सहन केले. पुढे तो डाव्या चळवळीत सहभागी झाला. शिक्षक बनला. लढाऊ शिक्षक नेता बनला. विश्वंभर भोसले यांची जीवन कहाणी मोठी रोमांचक व ग्रामीण वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे......


विश्वंभरचा जन्म लातूर तालूक्यातील गांजूरचा. 21 डिसेंबर, 1952 ही त्यांची जन्म तारीख. त्यांना तीन भाऊ व चार बहिणी. कुटूंबात ते सर्वात लहान. एकत्र कुटूंबात 40 एकर जमीन. पाच सहा एकर बागायती. विश्वंभरचे वडील धार्मिक वृत्तीचे. संपूर्ण कुटूंबावर धार्मिकतेचा पगडा, प्रचंड अज्ञान. गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना भोसले कुटूबाची मदत असायची. घरातील प्रशस्त हॉलमध्ये सप्ताह व्हायचा. परंतु भोसले कुटूंबीय कीर्तनकाराचे दर्शन घेऊ शकत नसत. या वातावरणामुळे गावात जिल्हा परिषदेची शाळा असूनही, कुटूंबातील कोणीही शाळेची पायरी चढलेली नव्हती. विश्वंभरला पहिल्यांदा ही संधी मिळाली. पहिलीपासूनच त्याला अस्पृश्यतेचे चटके जाणवू लागले. शाळा गावातील मंदिरात भरायची. मातंग व बौध्द समाजातील मुलं सर्वात शेवटी खालच्या बाजूला बसायची. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या सवर्णांना त्यांना ओलांडून जावे लागे. यातील दोघेजण मंदिरात जाताना या मागास विद्यार्थ्यांकडे बघून घाण घाण शिव्या द्यायचे. हे लोक का शिव्या देतात याचा उलगडा विश्वंभरला होत नसे. खाजगी शाळेत मारवाडी गुरूजी नावाचे शिक्षक होते. ते मागासवर्गीय मुलाची पाटी लांबूनच बघायचे. मंदिरात लोक येऊ लागले की, त्यांना बाजूला उभे करायचे. रामराव भोसलेंना गावातील या वातावरणाची कल्पना होती. त्यांचं प्रशस्त घर गावाच्या एका टोकाला होतं. सुट्टी असली की ते मुलांना शेतात घेऊन जात. गावात सप्ताह असला की, पोथी ऐकण्यासाठी आई – वडिलांसोबत तो गावात जायचा, दूर बसूनच पोथी ऐकत. याची विश्वंभरला मनोमन चीड येई.


विश्वंभर चौथीला असताना शाळेत बौध्द समाजाचे डावरे गुरूजी आले. त्यांनी एक नाटक बसवले. या नाटकात विश्वंभरची छोटीशी भूमिका होती. मंदिरावर या नाटकाचा प्रयोग झाला. नाटकात काम करण्यापेक्षा मंदिरात जाता आले याचाच त्याला अधिक आनंद झाला. गावातही जातीयता तीव्र होती. गावालगतच मांजरा नदी वाहते. सवर्ण मंडळी नदीच्या वरच्या भागात पाणी भरत तर दलित लोक नदीच्या खालच्या भागात. एकदा विश्वंभर नदीच्या वरच्या भागात पोहायला गेला तेव्हा गावातील सवर्णांनी त्याला पाण्यात बुडवू बुडवू मारले. चवथीला असताना डावरे गुरूजींनी त्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. चवथीनंतर त्याने वांगदरीच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला. हे गाव मांजरा नदीच्या दुसऱ्या तीरावर होते. वागंदरीत विठ्ठल व दगडू कांबळे हे त्याचे मामा होते. अनेकदा पूर आला की, विश्वंभरला पोहून जावे लागे. कमरेला भोपळ्याचे पेटे, डोक्याला कपडे व दप्तर अडकवून तो या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जायचा. पलीकडे त्याला घेण्यासाठी मामा हजर राहत. भाच्याची ही शिक्षणाची धडपड त्यांच्यासाठी कौतूकाचा विषय होती. यामुळे शाळेत पोचायला त्याला अनेकदा उशीर होई. शिक्षकांचा मार खावा लागे. इंग्रजीचे मधूकर कुलकर्णी हे शिक्षक उत्तम शिकवत. पाठांतर करून घेत. त्यांच्यामुळे विश्वंभरचे इंग्रजी, गणित पक्के झाले. याच काळात भोकरंबा येथील डॉ. आंबेडकर जयंती त्याच्या पाहण्यात आली. या वेळी दलित मुलांनी एक कलापथक बसवले होते. यात विश्वंभरही होता. या काळात आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याची जातीय जाणिव त्याच्यात निर्माण झाली.


या बालवयातच कॉ. गुडांप्पा जिरगे यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम विश्वंभरवर झाला. कॉ. जिरगे हे जहाल कम्युनिस्ट कार्यकर्ते. ते रामराव भोसले यांच्या घरी चहा प्यायला येत. येताना गावात सगळीकडे गाजावाजा करून येत. घरी आल्यानंतर रामरावांशी गप्पा मारीत. कधी चहा पीत तर कधी ताक. बाहेर लोकांबरोबर ते याची मुद्दाम चर्चा करीत. गांजूरमध्येच त्यांची एक बहीण होती. तिच्याकडे जाऊन ते म्हणत, मी भोसलेच्या घरी चहा पिऊन आलोय, मी बाटलो. बाटलेले भांडे जाळतेस तसे मला जाळ. त्यांच्या या बोलण्याचा विश्वंभरला संदर्भ लागत नसे. गुंडाप्पा मात्र त्याला मन लावून शिकण्याचा सल्ला देत.


8 वी ला लातूरच्या यशवंत विद्यालयात विश्वंभरला प्रवेश देण्यात आला. तो बौध्द नगरमध्ये हाताने स्वयंपाक करून रहायचा. यामुळे शाळेचा अभ्यास व्हायचा नाही. डी. जी. बनसोडे हे शिक्षक अभ्यास केला नाही म्हणून मारायचे. या माराच्या भितीपोटी त्याने शाळा बुडवायला सुरू केली. ही बाब बनसोडे गुरूजींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्वंभरला समजावून सांगितले. मारणार नसल्याची खात्री दिली. त्यानंतर त्याची नियमीत शाळा सुरू झाली. या काळात राम कांबळे नावाचे गुरूजी दलित विद्यार्थ्यांचे मोफत ट्युशन घेत. या ट्युशन शेवट पर्यंत टिकणारा विश्वंभर हाच होता. 8 वी पास वसतिगृहाची सुविधा म्हणून लेबर कॉलनीतील शिवाजी विद्यालयात त्याने नववीला प्रवेश घेतला. वसतिगृह कुडाचे होते. रस्त्यावर शौचाला बसावे लागे. जेवणही अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. भातात आळ्या निघत. त्यामुळे जेवणाची इच्छा होत नसे. प्रकृती बिघडू लागली. त्यातच त्य़ाला फक्त एक शर्ट व एकच चड्डी होती. तिच रात्री धुवून वापरावी लागे. अशा प्रतिकूल परिस्थितीत विश्वंभर दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाला. याच लातूरमध्ये झालेल्या एस. टी. डेपो डिव्हीजनच्या आंदोलनात त्याला विनाकारण मार खावा लागला होता.


दहावी पास होऊन गावाकडे गेल्याबरोबर गुंडाप्पा जिरगे विश्वंभर भोसले यांच्या घरी आले. त्यांचे रामराव भोसले यांच्याशी पूर्वीच बोलणे झालेले असावे. त्यांनी विश्वंभरला परळीला ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. विश्वंभरची परळीला जाण्याची तयारी नव्हती. परळीला त्याची एक आवडती मावशी रहायची. मावशीकडे रहायला मिळणार म्हंटल्यावर तो तयार झाला. वैद्यनाथ महाविद्यालयात त्यांने पीयूसीला प्रवेश घेतला. कॉलेजलाही तो हाफ चड्डीवरच जायचा. त्याच्या पायातील चपलेचा आवाज सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा. सुरूवातीच् सहा महिने त्याला वर्गात शिकवलेले काहीच समजत नव्हते. कॉलेजमध्ये मानसिक दबावाखालीच तो वावरायचा. समाजशास्त्राचे प्राध्यापक जगतकर यांनी त्याला एके दिवशी त्यांच्या झोपडीवजा घरी बोलावून त्याच्या मनातील भिती दूर केली. उषा ठोंबरे, मोतीराम दराडे हे चळवळे विद्यार्थी त्याच्याचबरोबर होते. त्यांच्यामुळे तो स्टुडंटन्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आला. इथेच त्याला वाचणाची आवाड निर्माण झाली. जीवनमार्ग या मार्क्सवादी विचाराच्या पत्रिकेने त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यानंतर हाती लागेल ते वाचण्याचा सपाटा त्याने लावला. याच काळात एसएफआयची पहिली राज्यव्यापी परिषद परळीत झाली. विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक मोईन शाकीर यांच्या परिषदेतील भाषणाचा त्याच्यावर परिणाम झाला. या काळात एसएफआय च्या बीड जिल्हा सेक्रेटरीपदाची जबाबदारीही विश्वंभर भोसले यांनी सांभाळली. परळीला असतानाच एके दिवशी बसस्थानकावर कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांची भेट झाली. त्यांचा रामराव भोसले यांच्याशी चांगला संबंध होता. कॉ. बुरांडे यांच्या व्यक्तिमत्वाचीही विश्वंभरवर छाप पडली. त्यांचा साधेपणा, पारदर्शीपणा व सगळ्यांकडे फक्त माणूस म्हणून पाहण्याती वृत्ती हे गुण खूपच भावले. बी.ए. व्दितीय वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेमिस्टर पध्दती सुरू झाली. यामुळे जुन्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. हा घोळ बराच काळ राहिल्याने वैतागून विश्वंभर गावी निघून आले. आपले शिक्षण संपले सेच गृहीत धरून ते बसले होते. काही दिवसातच गावातील प्रा. विठ्ठल मोरे त्यांच्याकडे आले व त्यांनी बळेबळेच त्यांना वाशीला नेले. येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात त्यांना बी. ए. प्रथम वर्षास प्रवेश घ्यावा लागला. इथे वसतिगृहाची उत्तम सोय होती. एके दिवशी जगदाळे मामा वाशीला आले. त्यांनी मुलांसोबतच वसतिगृहातच जेवण केले. त्यांच्या त्यागमय जीवनाचा विश्वंभरवर परिणाम झाला. आपणही इतरांसाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना त्यांच्यात निर्माण झाली. इथे तीन वर्षात त्यांनी बी.ए. पूर्ण केले. तुळजापूरच्या तुळजाभवानी महाविद्यालयात एम. ए. राज्यशास्त्र विषयाला प्रवेश घेतला. एम.ए. व्दितीय वर्षाचा एक पेपर राहिला. याचवेळी अंबाजोगाईच्य़ा शासकीय अध्यापक महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. 1984 साली विश्वंभर भोसले बी. एड्. झाले. शिक्षणाला पूर्णविराम मिळाला.


लातूरमधील संस्कारवर्धिनी निवासी विद्यालयात विश्वंभर भोसले यांची नोकरी सुरू झाली. मानधनाबरोबर जेवणाची सोय, ही त्यांच्यासाठी अधिक जमेची बाजू होती. वर्षभरानंतर व्यंकटेश विद्यालयात त्यांनी मुलाखत दिली. विश्वंभर यांच्या आईचे नुकतेच निधन झाले होते. वर्गात ‘आई’ कविता शिकवू लागले कि ते रडायचे. विद्यार्थीही रडायचे. शाळेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची हा कविता ऐकली. त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली. शाळेनंतरच्या वेळेत ते विविध चळवळीत सहभागी होत. दोन वर्ष सुरळीत पार पडली. त्यांना कायम करण्याऐवजी सेवामुक्त करण्यात आले. त्यात कुठल्याही कारणांचा उल्लेख नव्हता. विश्वंभर भोसले हा नक्षलवादी आहे, अशी हूल कोणीतरी जाणीवपूर्वक उठवली होती. त्यामुळे संस्थेने ही कार्यवाही केली होती. भोसले यांना सेवामुक्त केल्याचे कळताच मराठवाडा शिक्षक संघाचे नेते पी. जी. दस्तुरकर व प. म. पाटील भोसले यांच्या घरी आले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिघांनी तत्कालीन शिक्षक आमदार राजाभाऊ उदगीरकर यांची भेट घेतली. त्यांनी व्यंकटेशच्या मुख्याध्यापकांना बोलावून घेऊन, विश्वंभर भोसले यांना तात्काळ रूजू करून घेण्याचा आग्रह धरला. एकूण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन भोसले यांची सेवामुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर अल्पावधीतच एक विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी विश्वंभर भोसले यांची प्रतिमा तयार झाली. सुरूवातील मराठी व पुढे दहावीचा इतिहास शिकवण्याचे काम त्यांनी केले. स्कॉलरशिप परिक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा या जबाबदाऱ्याही त्यांनी व्यवस्थिपणे सांभाळल्या. भोसले यांनी आपल्या संपूर्ण शिक्षकी आयुष्यात गुणवत्तेबाबत कधीच तडजोड केली नाही. नापास विद्यार्थ्यांच्या एका तुकडीचा  शंभर टक्के निकाल देऊन त्यांनी त्यांची गुणवत्ता सिध्द केली. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जुनी पुस्तकं, वह्या वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी अनेक वर्ष राबवला. गरीब विद्यार्थ्यांना जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी केली. शिक्षकीपेशाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला.


चळवळ्या स्वभाव व मार्क्सवादी पक्षाचे सक्रिय सभासद असल्याने विश्वंभर भोसले शिक्षक चळवळीकडे ओढले गेले. राजाभाऊ उदगीरकर आमदार असताना पे युनीटसाठी संघटनेमार्फत देण्यात आलेला लढा त्यांना महत्तवाचा वाटतो. आणीबाणीत 1977 ला कॉ. बुरांडे यांनी स्वता: पावती फाडून त्यांना माकपचे सभासद करून घेतले. नामांतराच्या काळात त्यांच्यासोबत विविध गावांना भेटी दिल्या. शिक्षक संघटनेत प. म. पाटील व पी. जी. दस्तूरकर यांनी त्यांना काम करण्याची जाणीवपूर्वक संधी दिली. दस्तूरकर आमदार बनल्यानंतर त्यांच्यासोबतही भोसले यांनी अहोरात्र काम केले. प. म. पाटील निवडणूकीला उभे राहिल्यानंतर ते त्यांच्यासोबत राहिले. त्यांच्या विजयाला हातभार लावला. त्यांच्यासोबतही शिक्षकांच्या लढ्यात सहभाग दिला. 1995 पासून सतत 12 वर्ष मराठवाडा शिक्षक संघाचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले. शिक्षकांच्या प्रत्येत लढयात हिरीरिने सहभाग घेतला. आंदोलनात अनेक पोलिस केसेस झाल्या, जेल भोगली. काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याना कधीच परत पाठवले नाही. प्रत्येकाचा प्रयत्न धसास लागावा यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले. आयुष्यात अनेक मोहाचे प्रसंग आले, ते निग्रहाने टाळले. पैशाशिवाय काम होत नाही ही लोकांची धारणा असल्यामुळे लोक पैसे घेऊन येत. परंतु विश्वंभर भोसले यांनी आयुष्यात कधीही कोणाचा एकही पैसा घेतला नाही. सेवाभावी वृत्तीने त्यांनी सर्वांची कामे केली. एक फर्डे वक्ते अशी त्यांची ओळख असून, त्यांनी हे वक्तृत्व फक्त चळवळीसाठी वापरले.



शाळेतील जबाबदारी व्यवस्थित पार पाडून ते डाव्या चळवळीचे मोर्चे – आंदोलनात सहभागी होत. आपली ओळख लक्षात येऊ नये म्हणून ते डोक्यावर टोपी घालत. शेतकरी आंदोलनात सहभागी होत. व्यंकटेश शाळेतील शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शाळेसमोर सात – आठ वेळा उपोषणे लावली. महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळावरही काम करण्याची त्यांना संधी मिळाली. व्यंकटेश शाळेत झालेले मराठवाडा शिक्षक संघाचे अधिवेशन यशस्वी करण्याच त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. लातूर येथील शाळा न्यायाधिकरण, शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच रेल्वे रुंदीकरण आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीचे सदस्य व जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांना काम केले. गोदूताई परूळेकरांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ व  केरळचे कम्युनिस्ट नेते ए. के. गोपालन यांच्या ‘मेरी जीवनी’ या दोन्ही पुस्तकांनी त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम केला आहे. नंतरच्या काळात पोळ्याला गावातील मारुतीच्या मंदीराच जाऊन नारळ फोडण्याची बंडखोरी त्यांनी केली. कम्युनिस्ट पक्षात काम सुरू केल्यानंतर विश्वंभर भोसले हे पूर्णपणे नास्तिक बनले. एवढेच नव्हे तर त्यांच्या वडिलानांही धार्मिकता सोडली. गंगाधरआप्पानी त्यांना पक्षाचे पूर्णवेळ कार्येकर्ते होण्याचे सुचवले होते. परंतू ‘जात’ ही कामातील अडसर ठरू शकते हे लक्षात आल्याने त्यांनी ते नाकारले. आयुष्यात आई वारल्यानंतर त्यांना सर्वांत अधिक दु : ख झाले. जवळपास सहा महिने ते आजारी होते. बी. एड. पास होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचे ते सांगतात. आरक्षणाप्रमाणे संधी न मिळाल्याने ते संस्थेत प्राचार्य होऊ शकले नाहीत, याची खंत त्यांना आहे. तरीही पटने गुरूजींनी व्यंकटेश शाळेसाठी दिलेले योगदान खूप असल्याचे ते सांगतात. निवृत्तीनंतर श्रमिकांच्या प्रामाणिक चळवळी उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे.   


लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/