2010 मध्ये लातूरच्या ‘मुक्तरंग प्रकाशना’ने छापलेल्या ‘प्रतिकूलतेवर मात’ या पुस्तकातील माझे वडील विश्वंभर भोसले यांच्यावरील लेख .....................
शेती चांगली असल्याने अर्थिक परिस्थिती बरी म्हणण्याजोगी होती. कुटूंबावर धर्मिकतेचा प्रचंड पगडा होता. शिक्षणाचे महत्त्व माहित नव्हते, अशाही वातावरणात तो शिकला. बालपणापासून अस्पृशतेचे दाहक चटके त्याने सहन केले. पुढे तो डाव्या चळवळीत सहभागी झाला. शिक्षक बनला. लढाऊ शिक्षक नेता बनला. विश्वंभर भोसले यांची जीवन कहाणी मोठी रोमांचक व ग्रामीण वास्तवावर प्रकाश टाकणारी आहे......
विश्वंभरचा जन्म लातूर तालूक्यातील गांजूरचा. 21 डिसेंबर, 1952 ही त्यांची जन्म तारीख. त्यांना तीन भाऊ व चार बहिणी. कुटूंबात ते सर्वात लहान. एकत्र कुटूंबात 40 एकर जमीन. पाच सहा एकर बागायती. विश्वंभरचे वडील धार्मिक वृत्तीचे. संपूर्ण कुटूंबावर धार्मिकतेचा पगडा, प्रचंड अज्ञान. गावातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना भोसले कुटूबाची मदत असायची. घरातील प्रशस्त हॉलमध्ये सप्ताह व्हायचा. परंतु भोसले कुटूंबीय कीर्तनकाराचे दर्शन घेऊ शकत नसत. या वातावरणामुळे गावात जिल्हा परिषदेची शाळा असूनही, कुटूंबातील कोणीही शाळेची पायरी चढलेली नव्हती. विश्वंभरला पहिल्यांदा ही संधी मिळाली. पहिलीपासूनच त्याला अस्पृश्यतेचे चटके जाणवू लागले. शाळा गावातील मंदिरात भरायची. मातंग व बौध्द समाजातील मुलं सर्वात शेवटी खालच्या बाजूला बसायची. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या सवर्णांना त्यांना ओलांडून जावे लागे. यातील दोघेजण मंदिरात जाताना या मागास विद्यार्थ्यांकडे बघून घाण घाण शिव्या द्यायचे. हे लोक का शिव्या देतात याचा उलगडा विश्वंभरला होत नसे. खाजगी शाळेत मारवाडी गुरूजी नावाचे शिक्षक होते. ते मागासवर्गीय मुलाची पाटी लांबूनच बघायचे. मंदिरात लोक येऊ लागले की, त्यांना बाजूला उभे करायचे. रामराव भोसलेंना गावातील या वातावरणाची कल्पना होती. त्यांचं प्रशस्त घर गावाच्या एका टोकाला होतं. सुट्टी असली की ते मुलांना शेतात घेऊन जात. गावात सप्ताह असला की, पोथी ऐकण्यासाठी आई – वडिलांसोबत तो गावात जायचा, दूर बसूनच पोथी ऐकत. याची विश्वंभरला मनोमन चीड येई.
विश्वंभर चौथीला असताना शाळेत बौध्द समाजाचे डावरे गुरूजी आले. त्यांनी एक नाटक बसवले. या नाटकात विश्वंभरची छोटीशी भूमिका होती. मंदिरावर या नाटकाचा प्रयोग झाला. नाटकात काम करण्यापेक्षा मंदिरात जाता आले याचाच त्याला अधिक आनंद झाला. गावातही जातीयता तीव्र होती. गावालगतच मांजरा नदी वाहते. सवर्ण मंडळी नदीच्या वरच्या भागात पाणी भरत तर दलित लोक नदीच्या खालच्या भागात. एकदा विश्वंभर नदीच्या वरच्या भागात पोहायला गेला तेव्हा गावातील सवर्णांनी त्याला पाण्यात बुडवू बुडवू मारले. चवथीला असताना डावरे गुरूजींनी त्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. चवथीनंतर त्याने वांगदरीच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला. हे गाव मांजरा नदीच्या दुसऱ्या तीरावर होते. वागंदरीत विठ्ठल व दगडू कांबळे हे त्याचे मामा होते. अनेकदा पूर आला की, विश्वंभरला पोहून जावे लागे. कमरेला भोपळ्याचे पेटे, डोक्याला कपडे व दप्तर अडकवून तो या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर जायचा. पलीकडे त्याला घेण्यासाठी मामा हजर राहत. भाच्याची ही शिक्षणाची धडपड त्यांच्यासाठी कौतूकाचा विषय होती. यामुळे शाळेत पोचायला त्याला अनेकदा उशीर होई. शिक्षकांचा मार खावा लागे. इंग्रजीचे मधूकर कुलकर्णी हे शिक्षक उत्तम शिकवत. पाठांतर करून घेत. त्यांच्यामुळे विश्वंभरचे इंग्रजी, गणित पक्के झाले. याच काळात भोकरंबा येथील डॉ. आंबेडकर जयंती त्याच्या पाहण्यात आली. या वेळी दलित मुलांनी एक कलापथक बसवले होते. यात विश्वंभरही होता. या काळात आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याची जातीय जाणिव त्याच्यात निर्माण झाली.
या बालवयातच कॉ. गुडांप्पा जिरगे यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम विश्वंभरवर झाला. कॉ. जिरगे हे जहाल कम्युनिस्ट कार्यकर्ते. ते रामराव भोसले यांच्या घरी चहा प्यायला येत. येताना गावात सगळीकडे गाजावाजा करून येत. घरी आल्यानंतर रामरावांशी गप्पा मारीत. कधी चहा पीत तर कधी ताक. बाहेर लोकांबरोबर ते याची मुद्दाम चर्चा करीत. गांजूरमध्येच त्यांची एक बहीण होती. तिच्याकडे जाऊन ते म्हणत, मी भोसलेच्या घरी चहा पिऊन आलोय, मी बाटलो. बाटलेले भांडे जाळतेस तसे मला जाळ. त्यांच्या या बोलण्याचा विश्वंभरला संदर्भ लागत नसे. गुंडाप्पा मात्र त्याला मन लावून शिकण्याचा सल्ला देत.
8 वी ला लातूरच्या यशवंत विद्यालयात विश्वंभरला प्रवेश देण्यात आला. तो बौध्द नगरमध्ये हाताने स्वयंपाक करून रहायचा. यामुळे शाळेचा अभ्यास व्हायचा नाही. डी. जी. बनसोडे हे शिक्षक अभ्यास केला नाही म्हणून मारायचे. या माराच्या भितीपोटी त्याने शाळा बुडवायला सुरू केली. ही बाब बनसोडे गुरूजींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्वंभरला समजावून सांगितले. मारणार नसल्याची खात्री दिली. त्यानंतर त्याची नियमीत शाळा सुरू झाली. या काळात राम कांबळे नावाचे गुरूजी दलित विद्यार्थ्यांचे मोफत ट्युशन घेत. या ट्युशन शेवट पर्यंत टिकणारा विश्वंभर हाच होता. 8 वी पास वसतिगृहाची सुविधा म्हणून लेबर कॉलनीतील शिवाजी विद्यालयात त्याने नववीला प्रवेश घेतला. वसतिगृह कुडाचे होते. रस्त्यावर शौचाला बसावे लागे. जेवणही अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. भातात आळ्या निघत. त्यामुळे जेवणाची इच्छा होत नसे. प्रकृती बिघडू लागली. त्यातच त्य़ाला फक्त एक शर्ट व एकच चड्डी होती. तिच रात्री धुवून वापरावी लागे. अशा प्रतिकूल परिस्थितीत विश्वंभर दहावीची परिक्षा उत्तीर्ण झाला. याच लातूरमध्ये झालेल्या एस. टी. डेपो डिव्हीजनच्या आंदोलनात त्याला विनाकारण मार खावा लागला होता.
दहावी पास होऊन गावाकडे गेल्याबरोबर गुंडाप्पा जिरगे विश्वंभर भोसले यांच्या घरी आले. त्यांचे रामराव भोसले यांच्याशी पूर्वीच बोलणे झालेले असावे. त्यांनी विश्वंभरला परळीला ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला. विश्वंभरची परळीला जाण्याची तयारी नव्हती. परळीला त्याची एक आवडती मावशी रहायची. मावशीकडे रहायला मिळणार म्हंटल्यावर तो तयार झाला. वैद्यनाथ महाविद्यालयात त्यांने पीयूसीला प्रवेश घेतला. कॉलेजलाही तो हाफ चड्डीवरच जायचा. त्याच्या पायातील चपलेचा आवाज सर्वांचे लक्ष वेधून घ्यायचा. सुरूवातीच् सहा महिने त्याला वर्गात शिकवलेले काहीच समजत नव्हते. कॉलेजमध्ये मानसिक दबावाखालीच तो वावरायचा. समाजशास्त्राचे प्राध्यापक जगतकर यांनी त्याला एके दिवशी त्यांच्या झोपडीवजा घरी बोलावून त्याच्या मनातील भिती दूर केली. उषा ठोंबरे, मोतीराम दराडे हे चळवळे विद्यार्थी त्याच्याचबरोबर होते. त्यांच्यामुळे तो स्टुडंटन्स फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या संपर्कात आला. इथेच त्याला वाचणाची आवाड निर्माण झाली. जीवनमार्ग या मार्क्सवादी विचाराच्या पत्रिकेने त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्यानंतर हाती लागेल ते वाचण्याचा सपाटा त्याने लावला. याच काळात एसएफआयची पहिली राज्यव्यापी परिषद परळीत झाली. विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक मोईन शाकीर यांच्या परिषदेतील भाषणाचा त्याच्यावर परिणाम झाला. या काळात एसएफआय च्या बीड जिल्हा सेक्रेटरीपदाची जबाबदारीही विश्वंभर भोसले यांनी सांभाळली. परळीला असतानाच एके दिवशी बसस्थानकावर कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांची भेट झाली. त्यांचा रामराव भोसले यांच्याशी चांगला संबंध होता. कॉ. बुरांडे यांच्या व्यक्तिमत्वाचीही विश्वंभरवर छाप पडली. त्यांचा साधेपणा, पारदर्शीपणा व सगळ्यांकडे फक्त माणूस म्हणून पाहण्याती वृत्ती हे गुण खूपच भावले. बी.ए. व्दितीय वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेमिस्टर पध्दती सुरू झाली. यामुळे जुन्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. हा घोळ बराच काळ राहिल्याने वैतागून विश्वंभर गावी निघून आले. आपले शिक्षण संपले सेच गृहीत धरून ते बसले होते. काही दिवसातच गावातील प्रा. विठ्ठल मोरे त्यांच्याकडे आले व त्यांनी बळेबळेच त्यांना वाशीला नेले. येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात त्यांना बी. ए. प्रथम वर्षास प्रवेश घ्यावा लागला. इथे वसतिगृहाची उत्तम सोय होती. एके दिवशी जगदाळे मामा वाशीला आले. त्यांनी मुलांसोबतच वसतिगृहातच जेवण केले. त्यांच्या त्यागमय जीवनाचा विश्वंभरवर परिणाम झाला. आपणही इतरांसाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना त्यांच्यात निर्माण झाली. इथे तीन वर्षात त्यांनी बी.ए. पूर्ण केले. तुळजापूरच्या तुळजाभवानी महाविद्यालयात एम. ए. राज्यशास्त्र विषयाला प्रवेश घेतला. एम.ए. व्दितीय वर्षाचा एक पेपर राहिला. याचवेळी अंबाजोगाईच्य़ा शासकीय अध्यापक महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळाला. 1984 साली विश्वंभर भोसले बी. एड्. झाले. शिक्षणाला पूर्णविराम मिळाला.
लातूरमधील संस्कारवर्धिनी निवासी विद्यालयात विश्वंभर भोसले यांची नोकरी सुरू झाली. मानधनाबरोबर जेवणाची सोय, ही त्यांच्यासाठी अधिक जमेची बाजू होती. वर्षभरानंतर व्यंकटेश विद्यालयात त्यांनी मुलाखत दिली. विश्वंभर यांच्या आईचे नुकतेच निधन झाले होते. वर्गात ‘आई’ कविता शिकवू लागले कि ते रडायचे. विद्यार्थीही रडायचे. शाळेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची हा कविता ऐकली. त्यांची शिक्षक म्हणून निवड झाली. शाळेनंतरच्या वेळेत ते विविध चळवळीत सहभागी होत. दोन वर्ष सुरळीत पार पडली. त्यांना कायम करण्याऐवजी सेवामुक्त करण्यात आले. त्यात कुठल्याही कारणांचा उल्लेख नव्हता. विश्वंभर भोसले हा नक्षलवादी आहे, अशी हूल कोणीतरी जाणीवपूर्वक उठवली होती. त्यामुळे संस्थेने ही कार्यवाही केली होती. भोसले यांना सेवामुक्त केल्याचे कळताच मराठवाडा शिक्षक संघाचे नेते पी. जी. दस्तुरकर व प. म. पाटील भोसले यांच्या घरी आले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तिघांनी तत्कालीन शिक्षक आमदार राजाभाऊ उदगीरकर यांची भेट घेतली. त्यांनी व्यंकटेशच्या मुख्याध्यापकांना बोलावून घेऊन, विश्वंभर भोसले यांना तात्काळ रूजू करून घेण्याचा आग्रह धरला. एकूण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन भोसले यांची सेवामुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर अल्पावधीतच एक विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी विश्वंभर भोसले यांची प्रतिमा तयार झाली. सुरूवातील मराठी व पुढे दहावीचा इतिहास शिकवण्याचे काम त्यांनी केले. स्कॉलरशिप परिक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा या जबाबदाऱ्याही त्यांनी व्यवस्थिपणे सांभाळल्या. भोसले यांनी आपल्या संपूर्ण शिक्षकी आयुष्यात गुणवत्तेबाबत कधीच तडजोड केली नाही. नापास विद्यार्थ्यांच्या एका तुकडीचा शंभर टक्के निकाल देऊन त्यांनी त्यांची गुणवत्ता सिध्द केली. शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जुनी पुस्तकं, वह्या वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी अनेक वर्ष राबवला. गरीब विद्यार्थ्यांना जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी केली. शिक्षकीपेशाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला.
चळवळ्या स्वभाव व मार्क्सवादी पक्षाचे सक्रिय सभासद असल्याने विश्वंभर भोसले शिक्षक चळवळीकडे ओढले गेले. राजाभाऊ उदगीरकर आमदार असताना पे युनीटसाठी संघटनेमार्फत देण्यात आलेला लढा त्यांना महत्तवाचा वाटतो. आणीबाणीत 1977 ला कॉ. बुरांडे यांनी स्वता: पावती फाडून त्यांना माकपचे सभासद करून घेतले. नामांतराच्या काळात त्यांच्यासोबत विविध गावांना भेटी दिल्या. शिक्षक संघटनेत प. म. पाटील व पी. जी. दस्तूरकर यांनी त्यांना काम करण्याची जाणीवपूर्वक संधी दिली. दस्तूरकर आमदार बनल्यानंतर त्यांच्यासोबतही भोसले यांनी अहोरात्र काम केले. प. म. पाटील निवडणूकीला उभे राहिल्यानंतर ते त्यांच्यासोबत राहिले. त्यांच्या विजयाला हातभार लावला. त्यांच्यासोबतही शिक्षकांच्या लढ्यात सहभाग दिला. 1995 पासून सतत 12 वर्ष मराठवाडा शिक्षक संघाचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले. शिक्षकांच्या प्रत्येत लढयात हिरीरिने सहभाग घेतला. आंदोलनात अनेक पोलिस केसेस झाल्या, जेल भोगली. काम घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्याना कधीच परत पाठवले नाही. प्रत्येकाचा प्रयत्न धसास लागावा यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले. आयुष्यात अनेक मोहाचे प्रसंग आले, ते निग्रहाने टाळले. पैशाशिवाय काम होत नाही ही लोकांची धारणा असल्यामुळे लोक पैसे घेऊन येत. परंतु विश्वंभर भोसले यांनी आयुष्यात कधीही कोणाचा एकही पैसा घेतला नाही. सेवाभावी वृत्तीने त्यांनी सर्वांची कामे केली. एक फर्डे वक्ते अशी त्यांची ओळख असून, त्यांनी हे वक्तृत्व फक्त चळवळीसाठी वापरले.
शाळेतील जबाबदारी व्यवस्थित पार पाडून ते डाव्या चळवळीचे मोर्चे – आंदोलनात सहभागी होत. आपली ओळख लक्षात येऊ नये म्हणून ते डोक्यावर टोपी घालत. शेतकरी आंदोलनात सहभागी होत. व्यंकटेश शाळेतील शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी शाळेसमोर सात – आठ वेळा उपोषणे लावली. महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळावरही काम करण्याची त्यांना संधी मिळाली. व्यंकटेश शाळेत झालेले मराठवाडा शिक्षक संघाचे अधिवेशन यशस्वी करण्याच त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. लातूर येथील शाळा न्यायाधिकरण, शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच रेल्वे रुंदीकरण आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीचे सदस्य व जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांना काम केले. गोदूताई परूळेकरांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ व केरळचे कम्युनिस्ट नेते ए. के. गोपालन यांच्या ‘मेरी जीवनी’ या दोन्ही पुस्तकांनी त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम केला आहे. नंतरच्या काळात पोळ्याला गावातील मारुतीच्या मंदीराच जाऊन नारळ फोडण्याची बंडखोरी त्यांनी केली. कम्युनिस्ट पक्षात काम सुरू केल्यानंतर विश्वंभर भोसले हे पूर्णपणे नास्तिक बनले. एवढेच नव्हे तर त्यांच्या वडिलानांही धार्मिकता सोडली. गंगाधरआप्पानी त्यांना पक्षाचे पूर्णवेळ कार्येकर्ते होण्याचे सुचवले होते. परंतू ‘जात’ ही कामातील अडसर ठरू शकते हे लक्षात आल्याने त्यांनी ते नाकारले. आयुष्यात आई वारल्यानंतर त्यांना सर्वांत अधिक दु : ख झाले. जवळपास सहा महिने ते आजारी होते. बी. एड. पास होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचे ते सांगतात. आरक्षणाप्रमाणे संधी न मिळाल्याने ते संस्थेत प्राचार्य होऊ शकले नाहीत, याची खंत त्यांना आहे. तरीही पटने गुरूजींनी व्यंकटेश शाळेसाठी दिलेले योगदान खूप असल्याचे ते सांगतात. निवृत्तीनंतर श्रमिकांच्या प्रामाणिक चळवळी उभारण्याचा त्यांचा मनोदय आहे.
लेखकाचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा
http://movementswatch.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/
http://awhanabhi.blogspot.in/
No comments:
Post a Comment