पॉल आणि ओवेन. मला इंडोनेशियामध्ये मिळालेले मित्र. दोघंही साऊथ कोरियाचे. दोघं अभियांत्रिकी क्षेत्रात प्रयोगशील अाहेत. आम्ही तिघं आणि थायलंडची एक सहकारी असे एकाच प्रोजेक्टवर काम करत होतो. हे काम करत असताना आपापल्या देशाबद्दल सांगणं व्हायचं. चर्चा व्हायची.
एकदा असंच काम संपवून रात्री उशीरा चहा घेत असताना अचानक पॉल वैतागून बडबड करायला सुरू झाला. तो तसा एकदम भारी पोरगा. पण त्यादिवशी अचानक त्याचा संयम संपला. साचलेलं सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढू लागला.
साऊथ कोरियामध्ये पुरूषांना मिलिटरी सर्व्हिस बंधनकारक आहे. बंधनकारक म्हणजे काय तर १००% कंम्पलसरी. नो पळवाट. बरं ही सेवा एक दोन महिने नाही तर तब्बल दोन वर्ष अर्थात २४ महिने. या कालावधीत घरी जायचं नाही. फोन वापरायचा नाही म्हणजे नाही. सुट्ट्या वगैरे देखील किरकोळ. तिथल्या वरिष्ठांसाठी यात सहभागी होणारी पोरं म्हणजे बकरेच. जसं आमच्याकडं माध्यमात काम करणारे इंटर्न... पाणी निघेपर्यंत राबवून घेणार पण बायलाईन देणार नाहीत. काही जणांना थेट सैन्यात तर काहींना पोलीस दलामध्ये ही मिलिटरी सर्व्हिस मिळते. पोलीस दलात ज्याला संधी मिळेल. त्याला तुलनेनं जरा थोडी मोकळीक. उत्तर कोरियासोबत असलेल्या तणावाच्या संबंधामुळं ही मिलिटरी सर्व्हिस आहे. म्हणजे सतत युद्धासाठी सज्ज असायला हवं.
इंडोनेशियातून वापस गेल्यानंतर त्याला मिलिटरी सर्व्हिस मध्ये सहभागी व्हायचं होतं. आंतरराष्ट्रीय फेलोशिपवर काम करत असताना देखील मिलिटरी सर्व्हिसमध्ये जायच्या प्रचंड दडपणाखाली तो होता. त्या विचारानं तो वैतागला होता. पुढचे २४ महिने त्याच्या जीवनाचं सूत्र बदलणारे असतील. त्याची इच्छा आहे की नाही हा मुद्दा तिथं नाहीच. या सगळ्या प्रकारानंतर पुढचे अनेक दिवस मिलिटरी सर्व्हिस आमच्या चर्चेच्या केंद्रस्थानी होती. कदाचित त्याच्या देशात तो हे जर बोलला तर त्याला देशद्रोही, कमजोर समजलं जाईल. त्यामुळं तो इथं आतलं सगळं बोलू शकत होता.
ओवेनही वापस गेल्यानंतर पॉलच्या आधी ही सर्व्हिस जॉईन करणार आहे. पण तो याबद्दल काही बोलत नव्हता. त्यानं हे स्विकारलं होतं. गुरूवारी तो जॉईनही झाला. व्हॉट्सअपवर त्याच्याशी बोलणं झालं. राष्ट्रभक्ती वगेरैनं तो काही प्रेरित झालेला वाटला नाही. आपल्याकडच्या सारखंच त्याला राष्ट्रभक्तीचे डोस पाजण्याचा प्रयत्न झाला असेल.
पॉल पुढच्या आठवड्यात जॉईन होईल. त्यानंतर कित्येक महिने त्याच्याशी बोलणं होणार नाही. कदाचित वापस आल्यानंतर त्याच्यात आत्ताचा पॉल सापडणार नाही. त्यानं सांगितलेल्या अनुभवांनी माणसातला बदल हे या सर्व्हिसचं महत्त्वाचं प्रोडक्ट असल्याचं कळलं होतं. तो वापस येईल तेव्हा त्याच्यातला तो प्रयोगशील अभियंता जीवंत राहिलेला असतो का ? माहिती नाही.
त्याचं सगळं ऐकताना मला जर्मनीच्या सोफी शॉलचा बाय फ्रेंड आठवत असायचा. सोफी शॉलचा काळ १९४० च्या दरम्यानचा. तिच्या जीवनातील शेवटच्या काही दिवसांवर चित्रित सिनेमा मला जास्त भावलेला आहे. १९४३ मध्ये दुसर्या महायुद्धाला आणि हिटलरला विरोध करत शांततेची मागणी करणार्या तिला देशद्रोही ठरवून देहदंडाची शिक्षा सुनावली जाते. ती दिली जाते. ती जेलमध्ये असताना तिच्या बोलण्यातून बॉयफ्रेंडचे संदर्भ येतात. तो त्या सिनेमात कुठंही नाही. फक्त संदर्भांमध्ये आहे. शॉलला देहदंड दिला जात असताना तो ईस्ट फ्रंटवर मिलिटरी सर्व्हिस अंतर्गत लढत असतो. तो तिकडं लढत असताना त्याच्या जीवनातील महत्त्वाची माणसं इकडं संपवली जात असतात.
हे सगळं ऐकताना, एक प्रकारे आपल्या वैचारिक पूर्वजांनी आपल्याला किती स्वातंत्र्य सुरक्षित आयुष्य दिलंय ? याचा विचार यायचा. अर्थात सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हे सगळं आपण गमावत चाललो आहोत.
स्वातंत्र्यासोबत पाकिस्तान नामक दहशतीचा व्हायरस आमच्या डोक्यात पेरण्यात आला. हिंदुत्ववादी जर तेव्हा सत्तेत असते आणि पाकिस्तानची भिती निर्माण करून अशीच मिलिटरी सर्व्हिस आमच्यावर लादण्यात आली असती तर ? विचारानंच हादरल्यासारखं होतंय. ज्यावेळी आपण स्वत:ला घडवायची स्वप्न पाहत होतो, त्यावेळी काश्मीरच्या सीमेवर इच्छा नसताना जावं लागलं असतं तर ... तसं संघाच्या शाखेत जाणं आणि काठ्या चालवणं ही एक प्रकारची बिगर सरकारी मिलिटरी सर्व्हिसच आहे म्हणा. भविष्यात हे बिगर सरकारी धोरण अधिकृत सरकारी बनल तर...
पॉलची ती मानसिक अवस्था समजण्यापलीकडची होती. आपल्यातले अनेक जण हा विचार करून बंडखोर होवू पण असलं काही करायचा नाही असं ठरवतीलही. पण पॉलसाठी नकार दर्शविणं बंड करण्यापेक्षा अवघड आहे.
इंडोनेशियातून परतताना पॉलला तो ज्या दिवशी जॉईन करेल त्यादिवशी त्याच्याबद्दल आणि मिलिटरी सर्व्हिसबद्दल लिहिन असं म्हणालो होतो. पॉल पुढच्या आठवड्यात जॉईन होणार आहे. कदाचित त्यापूर्वी एकदा त्याच्याशी बोलणं होईल. त्यापूर्वी हे लिहिणं गरजेचं वाटलं. त्यानंतर दोन वर्ष उलटतील. त्याला जवळून ऐकल्यामुळं ही दोन वर्ष म्हणजे किती मोठा बदलांचा काळ असेल हे कळलंय. इंडोनेशियानं मला दिलेल्या अनेक आठवणीमध्ये पॉल, त्याची मिलिटरी सर्व्हिस कायम अस्वस्थ करत राहिल...





